
अहिल्यानगर जिल्ह्यातून एक मोठी अपघाताची बातमी समोर आली आहे. तिसगाव-शेवगाव महामार्गावर एका भीषण अपघातानंतर एसटी बस थेट रस्त्यावर पलटी झाली असून या दुर्घटनेत १४ प्रवासी जखमी झाले आहेत. यातील एका प्रवाशाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
मंडळी, मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वृद्धेश्वर कारखान्याजवळ हा अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार, समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारांना वाचवण्याचा प्रयत्न करताना एसटी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात जाऊन पलटी झाली.
अपघात इतका भीषण होता की बसचे मागील चार टायर एक्सलसह निखळून गेल्याची माहिती समोर आली आहे.
या बसमध्ये एकूण ५२ प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी १४ जण जखमी झाले असून सर्वांना उपचारासाठी तिसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने रात्री बस रस्त्यावरून हटविण्यात आली. दरम्यान, या परिसरात आवश्यक दिशादर्शक फलक आणि गतिरोधकांची कमतरता असल्याने वारंवार अपघात होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.





