
२८ ते ३० सप्टेंबरदरम्यान देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रस्तावित तीन दिवसीय संपामुळे बँकिंग सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, सहकारी बँकांच्या ग्राहकांसाठी दिलासादायक अपडेट समोर आली आहे.
देशभरातील सहकारी बँका या संपात सहभागी होणार नसून २८, २९ आणि ३० सप्टेंबर रोजी त्यांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. राज्य सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि प्राथमिक कृषी पतसंस्थांचा यात समावेश आहे.
त्यामुळे रोख रक्कम जमा करणे, पैसे काढणे, ग्रामीण भागातील बँकिंग व्यवहार आणि चेक क्लिअरन्ससारख्या सेवा सुरू राहण्याची माहिती देण्यात आली आहे.
सहकारी बँकिंग संस्थांच्या म्हणण्यानुसार, देशभरात सुमारे १,४५० शहरी सहकारी बँका, ३४ राज्य सहकारी बँका आणि ३५१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका कार्यरत आहेत. म्हणजेच, तुमचे खाते सहकारी बँकेत असेल, तर या तीन दिवसांत बँकिंग व्यवहारांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.





