
अहिल्यानगरमध्ये तरुणाच्या मारहाणीतील मृत्यूच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. पांढरीचा पूल परिसरातील ‘हॉटेल गुडलक’ पुन्हा सुरू करण्याच्या तयारीसाठी सागर महादेव ऊरुडे हा २८ वर्षीय तरुण गेला होता.
२१ ते २२ सप्टेंबरदरम्यान हॉटेलसमोर त्याला सागर भारत आव्हाड आणि शेखर राजेंद्र खंडागळे यांनी जबर मारहाण केल्याचा आरोप आहे.
या मारहाणीत सागरच्या शरीरावर गंभीर दुखापतींच्या खुणा आढळल्या. तसेच अंगावर चटके दिल्यासारख्या जखमाही असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर या घटनेत सागर ऊरुडे याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृताचा भाऊ विशाल महादेव ऊरुडे यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दाखल केली.
सहायक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. कारवाई करत पोलिसांनी सागर आव्हाड आणि शेखर खंडागळे या दोघांना अटक केली आहे. मारहाणीमागचं नेमकं कारण काय होतं, याचा तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.





