
मोठी बातमी.. आजपासून एसटीचा प्रवास महागला आहे. राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या भाड्यात १३.५६ टक्क्यांची वाढ लागू केली असून, या निर्णयाचा फटका लाखो प्रवाशांना बसणार आहे.
मंडळी, राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून नवीन भाडेदर लागू केले आहेत. या भाडेवाढीनंतर साध्या बसच्या पहिल्या टप्प्याचे तिकीट १० रुपयांवरून थेट १५ रुपये झाले आहे. तर शिवनेरी एसी स्लीपरसह इतर सेवांच्याही तिकीटदरात वाढ करण्यात आली आहे.
महामंडळाच्या म्हणण्यानुसार, डिझेलचे वाढलेले दर, एसटी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये झालेली वाढ, तसेच वाहनांच्या सुट्या भागांचा, टायरचा आणि देखभाल खर्चात झालेली वाढ यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थितीही दिवसेंदिवस खालावत आहे. गेल्या वर्षी प्रतिकिलोमीटरमागे ३ रुपये ५१ पैशांचा तोटा होता. तो आता वाढून ५ रुपये ६९ पैशांवर पोहोचला आहे. यापूर्वी १० टक्के हंगामी भाडेवाढ करूनही अपेक्षित महसूल मिळाला नसल्याचे महामंडळाचे म्हणणे आहे.
मात्र, या निर्णयावर प्रवासी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. वाढत्या महागाईच्या काळात पुन्हा एकदा सर्वसामान्य प्रवाशांवर आर्थिक भार टाकल्याची टीका होत आहे.





