
देशात सध्या डिझेलच्या दरांबाबत वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. किरकोळ आणि घाऊक डिझेलच्या किमतीत मोठी तफावत निर्माण झाली असून मोठ्या ग्राहकांना घाऊक दराच्या तुलनेत किरकोळ मध्ये म्हणजेच पेट्रोलपंपावर डिझेल तब्बल ४० रुपयांपर्यंत स्वस्त पडत आहे.
याचा फायदा घेण्यासाठी कारखाने, रुग्णालये, हॉटेल्स, मॉल्स, डेटा सेंटर आणि टेलिकॉम कंपन्यांकडून पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी होत आहे. काही औद्योगिक ग्राहक एकाचवेळी ४०० ते ६०० लिटरपर्यंत डिझेल घेत असल्याचं सांगितलं जात आहे.
मात्र यामुळे काही पेट्रोल पंपांवरील साठ्यावर दबाव वाढला आहे. त्यामुळे जिओ-बीपीने प्रति ग्राहक दररोज ५० लिटरची मर्यादा लागू केली आहे. नायरा एनर्जीच्या काही पंपांवर ही मर्यादा ७० ते २०० लिटरपर्यंत आहे.
सरकारी तेल कंपन्याही भविष्यात अशा मर्यादा लागू करण्याचा विचार करू शकतात. उद्देश एकच—सामान्य वाहनचालकांसाठी डिझेलचा पुरवठा सुरळीत ठेवणे.





