
शेवगावच्या राजकारणात अचानक असा ट्विस्ट आला आहे, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश आबा लव्हाट यांचे ज्येष्ठ सुपुत्र आणि आमदार अक्षय कर्डिले यांचे साडू इंजिनिअर अजिंक्य लव्हाट यांनी उबाठा गटात प्रवेश केला आहे.
नगर येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. या निर्णयामुळे शेवगावच्या राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाजपच्या प्रभावशाली कुटुंबातील सदस्याने विरोधी पक्षाची वाट धरल्याने चर्चांना आणखी उधाण आले आहे. पक्षप्रवेशानंतर अजिंक्य लव्हाट यांनी स्पष्ट केलं की, सामान्य जनतेवर होत असलेल्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
कोणत्याही पदाची अपेक्षा नसून पक्षप्रमुख देतील ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच वडील भाजपमध्येच सक्रिय असून, त्यांच्या राजकीय भूमिकेचा आणि आपल्या निर्णयाचा कोणताही संबंध नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
आता या घडामोडीचा शेवगावच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





