
“तुमचं मूल सतत डोळे मिचकावतं का? वारंवार खांदे उडवतं, हात झटकतं किंवा एखादा शब्द पुन्हा पुन्हा बोलतं का? अनेक पालक याकडे मुलांची सवय म्हणून पाहतात. पण तज्ज्ञांच्या मते ही लक्षणे ‘टॉरेट सिंड्रोम’ या मज्जासंस्थेशी संबंधित विकाराची असू शकतात.
मंडळी, टॉरेट सिंड्रोम हा असा विकार आहे ज्यामध्ये मुलं नकळत आणि अनियंत्रितपणे काही शारीरिक हालचाली करतात किंवा विशिष्ट आवाज काढतात.
यामध्ये डोळे सतत मिचकावणे, डोके किंवा खांदे झटकणे, ओठ विचित्रपणे हलवणे, हात-पाय वारंवार हलवणे अशी शारीरिक लक्षणे दिसू शकतात. तज्ज्ञांच्या मते हा विकार साधारणपणे ५ ते ७ वर्षांच्या वयात दिसू लागतो आणि १० ते १२ वर्षांच्या वयात त्याची तीव्रता वाढू शकते. मोबाइल, टीव्ही आणि व्हिडिओ गेम्सचा अतिवापर मेंदूला अधिक उत्तेजित करून टिक्स वाढवू शकतो. त्यामुळे स्क्रीन टाइम नियंत्रित ठेवण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
टॉरेट सिंड्रोमवर कायमस्वरूपी इलाज नसला तरी आज प्रभावी थेरपी आणि औषधोपचार उपलब्ध आहेत. योग्य वेळी निदान झाले तर मुलाचे दैनंदिन जीवन पूर्णपणे सामान्य राहू शकते. म्हणूनच तुमच्या मुलामध्ये अशी लक्षणे वारंवार दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. बालरोगतज्ज्ञ किंवा न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्या.





