
पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधील ‘थिंक टेक इंडिया’ या कंपनीने अचानक कार्यालय बंद करून गाशा गुंडाळल्याने 700 ते 800 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. या प्रकरणी कंपनीचा सीईओ हर्षल ठाकरे याला पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली आहे.
कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनुसार, कंपनीने नोकरी आणि प्रशिक्षणाच्या नावाखाली प्रत्येक प्रशिक्षणार्थीकडून लॅपटॉपसाठी 15 हजार रुपये घेतले. सुरुवातीला पगार आणि स्टायपेंडचे आश्वासन देण्यात आले, मात्र नंतर अनेक महिन्यांपासून वेतनच देण्यात आले नाही.
धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या आठ महिन्यांत पुण्यातील पाच आयटी कंपन्या अचानक बंद पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जवळपास चार ते पाच हजार कर्मचारी बेरोजगार झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कामगार संघटनांच्या मते, काही कंपन्या आधी विश्वास संपादन करतात, नंतर कर्मचाऱ्यांकडून सिक्युरिटी डिपॉझिट घेतात आणि अचानक कंपनी बंद करून गायब होतात.
या घटनांमुळे पुण्याच्या आयटी क्षेत्रातील स्थैर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, विशेषतः फ्रेशर्स आणि तरुण अभियंत्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.





