
दुष्काळामुळे रोजगाराच्या शोधात गाव सोडावं लागलं, पाण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करावं लागलं, तरी आता रेशनसाठी मूळ गावी परतण्याची गरज नाही ! कारण, राज्य सरकारच्या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर झाल्यानंतर सरकारने रेशन वितरणाबाबत विशेष व्यवस्था लागू केली आहे. ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजनेअंतर्गत या भागातील पात्र लाभार्थ्यांना राज्यातील कोणत्याही ई-पॉस यंत्रणा असलेल्या रास्त भाव दुकानातून धान्य घेता येणार आहे.
विशेष म्हणजे, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत अद्याप समावेश नसलेल्या पात्र नागरिकांनाही उत्पन्नाचे निकष आणि उपलब्ध मर्यादेनुसार अंत्योदय किंवा प्राधान्य कुटुंब योजनेत सामावून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दुष्काळाच्या काळात धान्याचा काळाबाजार आणि अवैध साठेबाजी रोखण्यासाठीही सरकार लक्ष ठेवणार आहे. पात्र कुटुंबांना वेळेत मोफत धान्य मिळण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आली आहे.
म्हणजेच, गावापासून दूर असलात तरी रेशनचा लाभ घेता येणार आहे ! शासनाच्या या निर्णयाचा लाभ अहिल्यानगरमधील सर्व तालुक्यातील नागरिकांना मिळेल.





