
एलपीजी ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे ! आता जड गॅस सिलिंडर उचलण्याचा त्रास कमी होणार आहे. भारत पेट्रोलियमने ‘भारत गॅस लाइट झिप’ ही नवीन प्रीमियम सेवा सुरू केली असून, यामध्ये वजनाने हलके आणि अत्याधुनिक कम्पोझिट एलपीजी सिलिंडर ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत.
या सिलिंडरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा पारदर्शक भाग. त्यामुळे सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, हे बाहेरूनच सहज दिसणार आहे. शिवाय हे सिलिंडर गंजरोधक असल्याने अधिक टिकाऊ आणि सुरक्षित असल्याचा कंपनीचा दावा आहे.
ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान कुटुंबांसाठी हा बदल विशेष फायदेशीर ठरणार आहे. यासोबतच नवीन गॅस कनेक्शनची प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली असून, एक्सप्रेस डिलिव्हरीची सुविधाही उपलब्ध केली जाणार आहे.
मुंबईपासून सुरू झालेली ही सेवा १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत देशातील १०० शहरांमध्ये सुरू करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.





