
महाराष्ट्र सरकारने महिलांना शेती क्षेत्रात अधिकृत ओळख मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र महिलाशेतकरी सक्षमीकरण अधिनियम २०२६ लागू केला आहे. याअंतर्गत महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
विशेष म्हणजे, हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जमीन स्वतःच्या नावावर असणं प्रत्येक वेळी आवश्यक नाही. कुटुंबाच्या शेतीत प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिलांनाही, आवश्यक स्थानिक प्रमाणपत्राच्या आधारे अर्ज करता येणार आहे.
अर्ज करण्यासाठी अधिकृत कृषी पोर्टलवर मोबाइल नंबर आणि आधारद्वारे नोंदणी करावी लागेल. त्यानंतर वैयक्तिक माहिती, बँक खाते आणि शेतीचा तपशील भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
तलाठी किंवा कृषी सहाय्यकाकडून डिजिटल पडताळणी झाल्यानंतर ई-प्रमाणपत्र जारी केलं जाणार आहे. यासाठी आधार कार्ड, मतदान कार्ड, अद्ययावत ७/१२, ८-अ, रहिवासी दाखला, फोटो आणि स्वयंघोषणापत्र अशी कागदपत्रे आवश्यक आहेत. या प्रमाणपत्रामुळे महिलांना कृषी योजना, कर्ज, विमा आणि इतर कृषी सुविधांचा लाभ घेण्यासाठी अधिकृत शेतकरी ओळख मिळण्यास मदत होऊ शकते.





