
नगरकरांनो, पुढील काही दिवस सार्वजनिक ठिकाणी वावरताना विशेष दक्षता घ्यायची आहे. कारण जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अपर जिल्हा दंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात १७ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू केले आहेत.
या आदेशानुसार परवानगीशिवाय मोठ्या प्रमाणात जमाव जमवणे, तसेच शस्त्र किंवा धोकादायक वस्तू बाळगण्यावर निर्बंध असणार आहेत. जिल्ह्यात शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मात्र, धार्मिक कार्यक्रम, लग्नसमारंभ, मिरवणुका आणि प्रेतयात्रांमधील जमावाला या आदेशातून सूट देण्यात आली आहे. तसेच कर्तव्यावर असलेले पोलीस, शासकीय अधिकारी-कर्मचारी आणि अधिकृत परवानगी घेतलेल्या सभा किंवा मिरवणुकांनाही यामधून वगळण्यात आले आहे.
प्रशासनाने नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही दिला आहे.





