
अहिल्यानगरमधून चिंताजनक बातमी समोर आलीये. इंधनाचा तुटवडा निर्माण झाला असून सुपा एमआयडीसीमधील उद्योग अडचणीत आले आहेत. मंडळी, पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा विस्कळीत झाला आहे.
याचा थेट परिणाम उद्योगांवर होत असून अनेक कंपन्यांमधील वाहने डिझेलअभावी बंद पडली आहेत. बहुतांश कारखाने विजेवर चालत असले, तरी वीजपुरवठा खंडित झाल्यास जनरेटरचा वापर केला जातो. मात्र सध्या जनरेटरसाठीही इंधन उपलब्ध नसल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सुपा आणि परिसरातील अनेक पेट्रोल पंप कोरडे पडले आहेत. नगर-पुणे रोडवरील काही पंप पूर्णपणे बंद होते. टँकर आल्यानंतरच इंधन मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, एका पंपावर मर्यादित प्रमाणात डिझेल देण्यात येत आहे. कारसाठी २ हजार रुपयांपर्यंत, तर ट्रकसाठी १० हजार रुपयांपर्यंतच डिझेल दिले जात आहे. त्यामुळे मालवाहतूक साखळीही विस्कळीत झाली आहे.
मंडळी, ही परिस्थिती अशीच राहिली, तर उद्योगांना मोठा फटका बसू शकतो आणि आर्थिक हालचालींवरही परिणाम होऊ शकतो. मंडळी शासन प्रशासन कोठेतरी कमी पडतंय का?





