
अहिल्यानगरमध्ये पुन्हा एकदा भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. बाधा दूर करतो असे सांगत एका कुटुंबाकडून लाखो रुपये उकळण्यात आले आणि एवढ्यावरच नाही, तर एका महिलेवर अत्याचार केलाय.
मंडळी, पारनेर तालुक्यातील ही घटना असून एका ४० वर्षीय शेतकरी महिलेने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी राजू बन्सी दिवटे हा सध्या फरार असून, त्याचा मुलगा शशिकांत दिवटे आणि शोभा तरटेस अटक केली आहे.
पीडित महिलेचा १७ वर्षांचा मतिमंद मुलगा असून उपचार करूनही त्याच्यात सुधारणा होत नव्हती. त्याचबरोबर भावाचे लग्नही जमत नव्हते आणि कर्जाचाही ताण होता. याच अडचणींचा फायदा घेत आरोपींनी स्वतःला देवऋषी असल्याचे सांगितले आणि काळुबाईची बाधा झाल्याचा दावा केला. यानंतर पूजा, होमहवन आणि तंत्र-मंत्राच्या नावाखाली तब्बल साडेचार लाखांपेक्षा जास्त रक्कम उकळण्यात आली.
पण या प्रकरणातील सर्वात धक्कादायक भाग म्हणजे मुलाच्या जीवाची भीती दाखवत भोंदूबाबाने महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपीने गुंगीचे पाणी पाजून ८ ते १० वेळा तिच्यावर अत्याचार केला. यानंतर पीडित महिलेने संपूर्ण प्रकार आपल्या कुटुंबाला सांगितला आणि अखेर पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.





