
उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत चालला आहे आणि आता मे महिन्यात उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.सध्या राज्यात तापमान झपाट्याने वाढत असून काही ठिकाणी तब्बल 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
IMD च्या अंदाजानुसार, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यानंतर आणि मे महिन्याच्या सुरुवातीला काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. विशेषतः महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात रात्रीच्या तापमानात थोडी घट होण्याची शक्यता आहे. मात्र हा दिलासा फार काळ टिकणार नाही.
कारण मे महिन्याच्या मध्यावरून पुन्हा तापमान वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. म्हणजेच सुरुवातीला थोडा आराम आणि नंतर पुन्हा उष्णतेचा जोर वाढणार आहे. विशेष म्हणजे, कोकण पट्ट्यात हा दिलासा खूपच मर्यादित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे उकाडा अधिक जाणवू शकतो.
एकूणच चित्र पाहिलं तर, मे महिन्याच्या सुरुवातीला थोडासा आराम मिळेल, पण त्यानंतर पुन्हा उष्णतेची लाट येण्याचे स्पष्ट संकेत आहेत. म्हणूनच नागरिकांनी काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. अनावश्यक उन्हात बाहेर पडणं टाळा, भरपूर पाणी प्या आणि स्वतःची तसेच कुटुंबाची काळजी घ्या असे आवाहन करण्यात आले आहे.





