
पाथर्डी शहरात पाणीटंचाई गंभीर होत असताना नगरपरिषदेने एक मोठा निर्णय घेतला आहे. पाण्याची बचत करण्यासाठी शहरातील सर्व वाहन धुलाई केंद्रे म्हणजेच वॉशिंग सेंटर पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, या निर्णयामुळे अनेक व्यावसायिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
७ ऑक्टोबर रोजी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने संबंधित व्यावसायिकांना नोटिसा दिल्या. उपलब्ध भूजलसाठा मर्यादित असल्याने नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करता यावा, यासाठी वाहन धुण्यासाठी बोअरवेल, पिण्याचे पाणी किंवा नगरपरिषदेच्या पाण्याचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. दुसरीकडे, वॉशिंग सेंटर चालक-मालकांनी या निर्णयामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि दैनंदिन खर्च भागवणे कठीण होईल, अशी भूमिका मांडली आहे.
पाणीबचतीला विरोध नसल्याचे स्पष्ट करत व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी संघटनेने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. आता प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





