
अहिल्यानगरमध्ये दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला… पण या उत्सवाने आगामी गणेशोत्सवाची एक मोठी चिंता समोर आणली आहे.
दहीहंडीच्या मिरवणुकीत डीजे आणि मोठ्या आवाजाच्या साऊंड सिस्टीमचा दणदणाट पाहायला मिळाला. त्यामुळे गणेशोत्सवातही असाच कर्णकर्कश आवाज घुमणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नागपूरमध्ये डीजेवर बंदीची भूमिका घेतली जात असताना, पुण्यातही डीजे बंदीची मागणी जोर धरत आहे. मात्र अहिल्यानगरमध्ये डीजेचा आवाज सुरूच असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्तींना मोठ्या आवाजाचा त्रास होत असल्याचे नागरिक सांगतात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह विविध संघटनांनी डीजेमुक्त आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आवाहन केले आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही डीजेबाबत सामोपचाराने मार्ग काढण्याची भूमिका मांडली आहे. आता प्रशासन खरंच नियमांची अंमलबजावणी करणार का?





