
“बाबा, दारू विकू नका…” एका १५ वर्षांच्या मुलीची ही विनंती एका बापाच्या मनाला इतकी भिडली की त्याने आयुष्यालाच नवं वळण दिलं.
अकोले तालुक्यातील लिंगदेव गावातील शंकर आढाव यांनी अनेक वर्षांचा अवैध दारूविक्रीचा व्यवसाय कायमचा बंद करण्याचा निर्णय घेतला. शाळेत “दारूवाल्याची मुलगी” म्हणून होणारा अपमान मुलीला सहन झाला नाही. तिने वडिलांसमोर मन मोकळं केलं आणि त्या एका क्षणाने सर्व काही बदललं.
स्वतःच्या मुलीच्या स्वाभिमानासाठी शंकर आढाव यांनी चुकीचा मार्ग सोडत प्रामाणिकपणे मासे विक्रीचा व्यवसाय सुरू केला. विशेष म्हणजे, गावात दारूबंदीसाठी लढा देणाऱ्या महिलांनीच त्यांच्या नव्या व्यवसायाचे उद्घाटन करून या सकारात्मक बदलाचं स्वागत केलं.
ही घटना सांगते की, बदलासाठी मोठ्या भाषणांची गरज नसते. कधी कधी आपल्या लेकराच्या एका शब्दातही आयुष्य बदलण्याची ताकद असते. अशा सकारात्मक बदलाला अहिल्यानगरलाईव्ह 24 चा सलाम.





