
अहिल्यानगरमध्ये पुन्हा एकदा खुनाची धक्कादायक घटना समोर आलीये. राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे झालेल्या भांडणात एका २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.
मंडळी, सत्यवान भाऊसाहेब साठे असे मृत तरुणाचे नाव असून तो गॅरेजमध्ये काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मात्र जुन्या आर्थिक वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार, आरोपी सुशील साठे याने संबंधित कुटुंबाला न सांगता त्यांची शेतजमीन फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवून कर्ज घेतले होते. यानंतर कर्जाच्या पैशांवरून दोघांमध्ये सतत वाद होत होते. मृताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीत आरोपीकडून वारंवार धमक्या दिल्या जात असल्याचे म्हटले आहे.
मंगळवारी देखील आरोपीने सत्यवान यांच्याशी कामाच्या ठिकाणी जाऊन वाद घातला होता. त्यानंतर बुधवारी पुन्हा दोघांमध्ये भांडण झाले आणि हा वाद विकोपाला गेला.यावेळी आरोपीने सत्यवान यांच्या डोक्यात टणक वस्तू मारली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र डोक्यावरील घाव जीवघेणा ठरला आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. राहुरी पोलिसांनी आरोपी सुशील साठे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.





