Explained

Ajay Baraskar vs Manoj Jarange | मनोज जरांगे जेलमध्ये जाणार? या ‘8’ जणांवर गंभीर आरोप

मराठा आरक्षणाचे आंदोलन गाजवणारे मनोज जरांगे पाटील आता खूप मोठ्या अडचणीत सापडले आहेत. थेट देशातील सर्वात मोठी तपास यंत्रणा म्हणजेच ED आता या आंदोलनाची पाळेमुळे खणून काढणार आहे. मराठा आरक्षणाच्या पवित्र आंदोलनाच्या नावाखाली तब्बल १,००० कोटी रुपयांचा महाघोटाळा झालाय, असा आरोप मराठा आरक्षणाचे अभ्यासक अजय बारस्कर यांनी केलाय. आणि हा फक्त आरोप नाही, तर बारस्कर थेट मुंबईच्या ‘ईडी’ कार्यालयात पुरावे घेऊन पोहोचलेत! नेमका काय आहे हा वाळू माफियांचा धंदा? आणि जरांगेंचे ते ८ शिलेदार कोण आहेत, ज्यांची नावे ईडीकडे सोपवण्यात आलीत?

मनोज जरांगे यांच्यावर थेट ईडीमध्ये तक्रार करणारे हे अजय बारस्कर नेमके कोण आहेत? ते कुठले आहेत? आणि त्यांचा या आंदोलनाशी काय संबंध आहे? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर चला जाणून घेऊयात बारस्करांचा इतिहास!

अजय साहेबराव बारस्कर म्हणजेच अजय महाराज बारस्कर हे मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत. त्यांचा जन्म एका पारंपरिक वारकरी मराठा कुटुंबात झाला आहे. बारस्करांचा दावा आहे की, ते काल-परवाचे आंदोलक नसून, २००६ सालापासून म्हणजेच गेल्या २० वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी वेगवेगळ्या पातळीवर काम करत आहेत. सगळ्यात महत्त्वाचा ट्विस्ट म्हणजे, अजय बारस्कर हे बाहेरचे कुणी नसून मनोज जरांगे पाटील यांचे एकेकाळचे अत्यंत जवळचे सहकारी आणि कोअर कमिटीचे सदस्य होते! जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे जेव्हा मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला होता, तेव्हा जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देत बारस्कर सक्रिय झाले होते.

इतकेच नाही, तर सुरुवातीच्या काळात जेव्हा सरकारच्या प्रतिनिधींसोबत किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत जरांगे पाटील यांच्या चर्चा व्हायच्या, तेव्हा जरांगेंच्या बाजूने अजय बारस्कर स्वतः त्या बैठकांमध्ये उपस्थित असायचे. अजय बारस्कर यांचा राजकीय इतिहास पाहिला तर त्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मतदारसंघातून बहुजन मुक्ती पार्टीकडून निवडणूकही लढवली होती. त्यामुळे मनोज जरांगे यांचे प्रत्येक आंदोलन, त्यांची रणनीती आणि त्यांच्या आसपासचे लोक यांना बारस्कर खूप जवळून ओळखतात.

गेल्या काही काळापासून जरांगे यांच्या आंदोलनाचे मार्ग बदलले आणि भूमिका बदलू लागल्या, तेव्हा बारस्करांनी जाहीर पत्रकार परिषदा घेत जरांगे यांच्यावर थेट ‘सुपारीबाज’ आणि ‘लबाड’ असल्याचा आरोप केला होता. आणि आता तर त्यांनी थेट जरांगे आणि त्यांच्या पूर्ण टोळीने वाळू तस्करीतून हजार कोटी कमावल्याचा आरोप करत ईडीचे दरवाजे ठोठावले आहेत!

आता तुमच्या लक्षात आले असेलच की, आरोप करणारा माणूस बाहेरचा नसून जरांगेंच्या चळवळीत आतपर्यंत घुसलेला जुना सहकारी आहे. म्हणूनच या ईडीच्या तक्रारीला महाराष्ट्राच्या राजकारणात एवढे मोठे वजन प्राप्त झाले आहे. अजय बारस्कर स्वतः मुंबईतील ईडी कार्यालयात गेले होते. त्यांनी तिथल्या डेप्युटी डायरेक्टर म्हणजेच उपसंचालकांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे लेखी तक्रार सोपवली.

बारस्कर मीडियाशी बोलताना म्हणाले की, ‘मराठा समाजाच्या आरक्षणाच्या नावाखाली मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कल्पनाही करता येणार नाही एवढा, म्हणजे किमान १,००० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे! या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे आणि तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे.

पण हा पैसा आला कुठून? आणि यात कोण कोण सामील आहे? अजय बारस्कर यांनी थेट नावांची यादीच ईडीला दिली आहे. यामध्ये मनोज जरांगे यांचे मेहुणे आणि अत्यंत जवळच्या ७ ते ८ सहकाऱ्यांचा समावेश आहे.
ती नावे खालीलप्रमाणे:

१. पांडुरंग तारक
२. ईश्वर बलांडे
३. गंगाधर काळकुटे
४. श्रीराम पुरणकर
५. संजय कटारे…
आणि जरांगेंच्या नातेवाईकांमध्ये:
६. स्वप्नील तारक
७. बद्रीनाथ तारक
८. विलास खेडकर (मनोज जरांगे यांचे मेहुणे)

बारस्करांचा सर्वात मोठा आरोप काय आहे माहितीये? ते म्हणतात, ‘वाळूचा माफिया’ हा या लोकांचा सगळ्यात मोठा धंदा आहे. वाळूच्या बेकायदेशीर उपशातून आणि तस्करीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे आणि ईडीला वाळूच्या अवैध धंद्यांवर आणि मनी लाँड्रिंगवर कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार आहेत. म्हणूनच या १,००० कोटींच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी बारस्करांनी केली आहे.

बारस्करांनी केवळ तोंडी आरोप केलेले नाहीत, तर त्यांनी काही खळबळजनक प्रश्न उपस्थित केलेत.

ते विचारतात:

-आंदोलनाच्या काळात अचानक या लोकांकडे कोट्यवधी रुपयांच्या लक्झरी ‘डिफेंडर’ गाड्या कुठून आल्या?

-मुंबईतील लीलावतीसारख्या अत्यंत महागड्या रुग्णालयात उपचारासाठी लागणारा लाखो रुपयांचा खर्च कोण करत आहे? हा पैसा कुठून येतो?

-इतकंच नाही, तर जरांगेंचे निकटवर्तीय पांडुरंग तारक यांच्याकडे आधी फक्त १० गुंठे जमीन होती, मग आता अचानक त्यांनी ५० एकर आणि २८ एकर जमीन कुठे आणि कशी खरेदी केली?

-अंतरवली सराटी आणि छत्रपती संभाजीनगर परिसरात झालेल्या या कोट्यवधींच्या जमिनींच्या खरेदीचा आर्थिक स्रोत काय?

याची पाळेमुळे खणून काढण्यासाठी या सर्वांना ईडीने तात्काळ चौकशीसाठी बोलवावे, अशी मागणी बारस्करांनी लावून धरली आहे.

एकीकडे मराठा समाज आरक्षणासाठी प्रामाणिकपणे रस्त्यावर उतरला आहे, तर दुसरीकडे आंदोलनाच्या नावाखाली हजार कोटींच्या गैरव्यवहाराचे हे गंभीर आरोप होत आहेत. या आरोपांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. आता यावर अंमलबजावणी संचालनालय खरोखरच मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशी करणार का? आणि या गंभीर आरोपांवर स्वतः मनोज जरांगे पाटील काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button