
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली असून, एका इंजिनिअर मुलाने आपल्या वडिलांचा खून केलाय.
मंडळी, नेवासे रस्त्यावरील अशोकनगर फाटा परिसरात राहणारे सचिन ढोकचौळे यांचा त्यांच्या राहत्या घरात मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या डोक्यावर गंभीर वार करण्यात आला होता. घटनास्थळी टिकाव देखील आढळून आला.
सचिन ढोकचौळे यांना दोन मुले आहेत. त्यांचा मोठा मुलगा प्रणव हा मॅकेनिकल इंजिनिअर असून काही दिवसांपूर्वी नोकरी सोडून गावी परत आला होता. घटनेच्या दिवशी सकाळी घरातील सदस्यांना सचिन ढोकचौळे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यानंतर एकच खळबळ उडाली.
या प्रकरणात प्रणव याच्यावर वडिलांच्या खुनाचा आरोप करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, घरातील कौटुंबिक कारणांमुळे आणि मनात साचलेल्या रागातून हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. मात्र नेमके कारण काय होते, याचा तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, आरोपीच्या वर्तणुकीबाबत विविध चर्चा सुरू असल्या तरी त्याच्या आरोग्याविषयी किंवा मानसिक स्थितीविषयी कोणताही निष्कर्ष अधिकृत वैद्यकीय तपासणी आणि चौकशी पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.





