Latest

अहिल्यानगर ड्रग्जच्या विळख्यात ! शहरात ३० लाखांचे मेफेड्रोन सापडले

अहिल्यानगरमध्ये पुन्हा एकदा ड्रग्जचा मोठा साठा सापडला असून, या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. तब्बल ३० लाख रुपये किमतीचे मेफेड्रोन, म्हणजेच एमडी ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले असून, याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर आणखी दोघे आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

मंडळी, ही कारवाई सावेडी उपनगरातील मिस्कीनमळा परिसरात तोफखाना पोलिसांनी केली. पोलिसांचे गस्ती पथक परिसरात असताना विनाक्रमांकाची एक चारचाकी संशयास्पदरीत्या फिरताना दिसली. पोलिसांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून वाहन अडवले.

या कारवाईत वसीम बागवान, जिशान सय्यद आणि रिहान शेख या तिघांना ताब्यात घेण्यात आले. तर दोन जण अंधाराचा फायदा घेत पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये सुमारे १५० ते १६० ग्रॅम मेफेड्रोन हा अमली पदार्थ आढळून आला. या ड्रग्जची किंमत जवळपास ३० लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

मंडळी, गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगरमध्ये ड्रग्जसंबंधित कारवाया वाढताना दिसत आहेत. त्यामुळे शहरात नेमकं ड्रग्जचं रॅकेट किती मोठं आहे, हा प्रश्न आता पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button