
३१ लाखांचे मेफेड्रोन, कारमध्ये खेळण्याचे पिस्तूल, चाकू आणि अपहरणाचे साहित्य… अहिल्यानगरात नेमकं सुरू होतं तरी काय ? मंडळी, अहिल्यानगरच्या मिसकीन मळा परिसरात तोफखाना पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल १५४ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे ३१ लाख रुपये आहे.
या प्रकरणात जिशान सय्यद, रिहान शेख आणि वसिम बागवान यांना अटक करण्यात आली आहे, तर जमीर निसार शेखसह आणखी एक आरोपी फरार आहे. प्राथमिक तपासात मेफेड्रोन जमीर शेख याने आणल्याची माहिती समोर आली आहे.
जप्त कारमधून खेळण्याचे पिस्तूल, चाकू, मास्क, हातमोजे, दोरी आणि चिकट पट्टीही सापडल्याने दरोडा किंवा अपहरणाचा कट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
तपासादरम्यान पुणे आणि मुंब्रा येथून अहिल्यानगरमध्ये ड्रग्सचा पुरवठा होत असल्याची शक्यता तपासली जात आहे. आता पोलिसांचे लक्ष्य केवळ आरोपी नव्हे, तर संपूर्ण ड्रग्स पुरवठा साखळी उघड करून जिल्ह्यातील अमली पदार्थांचे जाळे कायमचे उद्ध्वस्त करण्यावर आहे.





