
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट समोर आला आहे. तब्बल एक हजार मतदार प्रतिनिधी छाननीत अपात्र ठरू शकतात, अशी चर्चा सहकार विभागात सुरू आहे. जिल्हा बँकेच्या ५ हजार ८९० सभासद संस्थांनी प्रतिनिधींचे ठराव सादर केले आहेत. मात्र आता प्रत्येक ठरावाची बारकाईने छाननी होणार आहे.
बंद पडलेल्या संस्था, रद्द झालेली नोंदणी, विलीनीकरण झालेल्या संस्था किंवा अधिकार गमावलेल्या संस्थांचे ठराव बाद होण्याची शक्यता आहे. याशिवाय, बँकेच्या शेअरची ५ हजार रुपयांची अनिवार्य रक्कम न भरलेल्या संस्थांनाही मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे अंतिम मतदार यादीत मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
छाननी पूर्ण झाल्यानंतर पात्र संस्थांची यादी नाशिक विभागीय सहकार कार्यालयाकडे पाठवली जाईल. त्यानंतर प्रारूप मतदार यादी, हरकती आणि अंतिम यादीचा टप्पा पार पडणार आहे. या छाननीमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीचं संपूर्ण राजकीय गणित बदलणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.





