
अहिल्यानगरमधून एक धक्कादायक ब्रेकिंग समोर आली आहे. अवैध वाळू उत्खननावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावरच जेसीबी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी अक्षरशः खड्यात उड्या मारून आपला जीव वाचवला.
मंडळी, हा थरारक प्रकार पाथर्डी तालुक्यातील ढाकणवाडी शिवारात घडला. नदीपात्रातून जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी रात्री पोलिस पथकाने घटनास्थळी छापा टाकला.
पोलिसांनी छापा टाकताच तीन ट्रॅक्टर आणि एक जेसीबी चालकांनी वाहने भरधाव वेगाने पळवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी जेसीबी चालकाने थेट पोलिस कर्मचारी संजय जाधव आणि पोलिस उपनिरीक्षक विशाल लहाने यांच्या अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न केला.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे दोन्ही पोलिसांनी वाळू उपशामुळे तयार झालेल्या खोल खड्यात उडी मारली आणि थोडक्यात आपला जीव वाचवला. यानंतर पोलिसांनी कारवाई करत मुद्देमाल जप्त केला. तसेच ट्रॅक्टर चालक अशोक शिरसाठ याला ताब्यात घेण्यात आले.
मंडळी, अवैध वाळू उत्खननाविरोधातील कारवाईदरम्यान पोलिसांच्या जीवावर बेतलेली ही घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे. या प्रकरणात पुढे आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.





