
कांद्याचे दर कधी घसरतात, तर कधी वाढतात… त्यामुळे उत्पादन खर्चही निघणार की नाही, या चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी घोडेगावातून दिलासादायक बातमी समोर आली आहे.
नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव बाजार आवारात सोमवारी चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रतिक्विंटल ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. गेल्या काही दिवसांपासून दरातील चढउतारामुळे अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादकांना या दरामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
कांदा पिकासाठी बियाणे, खते, औषधे, मजुरी, पाणी आणि वाहतुकीवर मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे चांगला बाजारभाव मिळणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरते. शेतकरी वाढत्या उत्पादन खर्चामुळे आगामी काळातही चांगले दर मिळण्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत.
दरम्यान, दर्जेदार कांद्याला बाजारात मागणी असल्याने समाधानकारक भाव मिळत असल्याचे कांदा आडतदार संभाजी पवार यांनी सांगितले. आता आगामी काळातही कांद्याचे दर टिकणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे!





