Latest

अहिल्यानगरच्या क्रिकेटविश्वासाठी अभिमानाची बातमी; अष्टपैलू क्रिकेटपटू समृद्धी शिंदेंची थेट महाराष्ट्राच्या अंडर-१९ संघात निवड !

मोठं स्वप्न पाहण्यासाठी वयाचं बंधन नसतं, पण ते पूर्ण करण्यासाठी जिद्द मात्र लागते! आणि हीच जिद्द दाखवलीय अहिल्यानगरच्या समृद्धी शिंदेने. गल्लीबोळातून क्रिकेट खेळण्यापासून ते थेट महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील संघात पोहोचण्यापर्यंतचा तिचा हा प्रवास आता चर्चेत आलाय.

पाईपलाईन रोडवर राहणाऱ्या समृद्धी प्रवीण शिंदेची बीसीसीआयच्या २०२६-२७ मधील १९ वर्षांखालील महिला टी-२० एलिट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. समृद्धी न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात शिकते, तर अनुपम संकलेचा क्रिकेट अकॅडमीमध्ये ती क्रिकेटचे धडे गिरवते.

विशेष म्हणजे, समृद्धी डावखुरी वेगवान गोलंदाज आहे आणि उजव्या हाताने फलंदाजीही करते. म्हणजेच चेंडू हातात असो किंवा बॅट हातात, दोन्ही आघाड्यांवर मैदान गाजवण्याची तिची तयारी आहे.

या संघाचं नेतृत्व भाविका अहिरे करणार असून सह्याद्री कदम उपकर्णधारपद सांभाळणार आहे. आता या स्पर्धेत समृद्धीला स्वतःचं कौशल्य दाखवण्याची मोठी संधी मिळणार आहे.

नक्कीच अहिल्यानगरच्या या लेकीने मारलेली झेप अनेक नवोदित खेळाडूंना प्रेरणा देणारी आहे. कारण स्वप्न मोठं असेल आणि मेहनत प्रामाणिक असेल, तर मैदानही संधी देतंच!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button