
पाण्याच्या वादातून थेट घरावर हल्ला ! पुण्यातून भाडोत्री गुंड आणून एका कुटुंबाला मध्यरात्री बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना कर्जत तालुक्यातील नांदगाव येथे समोर आली आहे.
नांदगाव येथील दत्तात्रय गायकवाड आणि त्यांच्या चुलत भावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या वापरावरून जुना वाद सुरू होता. पोलिसांच्या माहितीनुसार, २ जून रोजी रात्री सव्वा बाराच्या सुमारास काही जण बोलेरो आणि अन्य वाहनातून गावात आले.
घराच्या पडवीत झोपलेल्या कुटुंबावर लाकडी काठ्या आणि लोखंडी गजाने हल्ला करण्यात आला. या घटनेत कुटुंबातील अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
आरडाओरडा ऐकून ग्रामस्थ धावून आल्याने हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष बाब म्हणजे, हल्ल्यात वापरण्यात आलेल्या बोलेरो जीपवर ‘पोलिस’ असे लिहिलेले असल्याचे समोर आले असून पोलिसांनी ती गाडी जप्त केली आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून सर्व संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.





