
शेतकऱ्यांनो, आधुनिक शेतीसाठी लाखो रुपयांच्या योजनांचा लाभ मिळवण्याची मोठी संधी आली आहे. पण त्यासाठी वेळेत अर्ज करणे महत्त्वाचे आहे. अहिल्यानगर जिल्हा परिषदेने सेस फंडातून शेतकऱ्यांसाठी तीन महत्त्वाच्या योजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये कडबाकुट्टी मशीन, स्लरी फिल्टर आणि कृषी ड्रोन यांचा समावेश असून लाभार्थ्यांची निवड संगणकीय लॉटरीद्वारे केली जाणार आहे.
या योजनांसाठी २१ जुलै ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत संबंधित पंचायत समितीकडे अर्ज करावे लागतील. त्यानंतर अर्जांची छाननी होऊन १ ते ५ सप्टेंबर दरम्यान पारदर्शक पद्धतीने लॉटरी काढली जाईल.
पात्र लाभार्थ्यांना ८ सप्टेंबरपासून पूर्वसंमती पत्र देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबवली जात असून, कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे यांनी पात्र शेतकरी, नोंदणीकृत गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.





