Latest

शेतकरी महिलेवर दिवसाढवळ्या बिबट्याचा हल्ला… पण विनाशस्त्र महिलेने एकटीने बिबट्या पळवला, संगमनेरमध्ये नेमक काय घडलं ?

शेतात कामाला निघालेल्या महिलेच्या वाटेत अचानक बिबट्या आला ! समोर मृत्यू उभा असताना अनेक जण घाबरून जातील. पण या महिलेने हार मानली नाही. उलट बिबट्याशीच दोन हात करत स्वतःचा जीव वाचवला.

ही घटना आहे संगमनेर तालुक्यातील डिग्रस गावातली. आशा संतोष निठवे, वय वर्षे ३०. बुधवारी, १४ ऑक्टोबर रोजी सकाळी सातच्या सुमारास त्या कांद्याच्या रोपांची निंदणी करण्यासाठी शेताकडे निघाल्या होत्या.

पण जवळच असलेल्या कपाशीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. काही क्षणांसाठी आशा याही गांगरल्या. मात्र, त्यांनी प्रसंगावधान राखलं. आरडाओरडा करत बिबट्याचा मुकाबला केला. अखेर त्यांचा प्रतिकार पाहून बिबट्याने तिथून पळ काढला.

मात्र, या झटापटीत आशा यांच्या चेहऱ्यासह शरीरावर गंभीर जखमा झाल्या. सध्या त्यांच्यावर संगमनेरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर वनविभागाने घटनास्थळी पंचनामा करून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. मात्र, परिसरात वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थ चिंतेत आहेत. कारण प्रश्न फक्त एका हल्ल्याचा नाही, तर शेतात जाणाऱ्या प्रत्येकाच्या सुरक्षिततेचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button