
अहिल्यानगरमधून एक दुःखद घटना समोर आली आहे. एमआयडीसी परिसरातील जी ब्लॉक ८२ येथे विहिरीच्या पाण्यात पडल्याने १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. राहुल बाळासाहेब भोसले असं मृत तरुणाचं नाव आहे. ७ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली.
राहुल विहिरीच्या पाण्यात पडल्याचं समोर आल्यानंतर त्याचा मित्र स्वप्नील बाळासाहेब संसारे याने त्याला तातडीने रुग्णालयात नेलं. रात्री पावणे नऊच्या सुमारास राहुलला अहिल्यानगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
मात्र, तिथे वैद्यकीय अधिकारी डॉ. चोपडे यांनी तपासणी केली असता राहुलला उपचार सुरू करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आलं. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अवघ्या १९ वर्षांच्या राहुलच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राहुल विहिरीत नेमका कसा पडला, याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही.





