
शेतकरी मित्रांनो, पेरणीची घाई करू नका! कारण मान्सून पुन्हा एकदा लांबला असून पुढील काही दिवस पावसाची स्थिती फारशी समाधानकारक नसणार आहे.
अहिल्यानगरसह राज्यातील अनेक भागात सुरुवातीला पाऊस झाला, पण त्यानंतर कडक ऊन पडल्याने शेतातील ओलावा टिकला नाही. अनेक ठिकाणी अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. काही भागात तर मान्सूनचे दर्शनही झालेले नाही.
हवामान अभ्यासक आणि जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ यांच्या मते, सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनला मदत करणारी कोणतीही मजबूत हवामान प्रणाली सक्रिय नाही.
शिवाय पश्चिम प्रशांत महासागरातील ‘मेखला’ चक्रीवादळामुळे पावसासाठी आवश्यक असलेले बाष्पयुक्त वारे भारताकडे येण्याऐवजी दुसऱ्या दिशेने खेचले जात आहेत.
यामुळे २ जुलैपर्यंत हलका ते मध्यम आणि विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून मान्सून पुन्हा सक्रिय होऊन सर्वदूर चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे हवामानाचा अंदाज लक्षात घ्या आणि योग्य वेळेतच शेतीची कामे सुरू करा.





