
अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील सुरू होत आहे. पण अनेकांना प्रश्न पडतो ही विधान परिषद निवडणूक नेमकी कशी होते? मतदान कोण करतं? आणि प्रक्रिया काय असते? चला जाणून घेऊया..
मंडळी, आजपासून म्हणजेच २५ मे पासून इच्छुक उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहेत. या निवडणुकीत सर्वसामान्य नागरिक मतदान करत नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य हेच या निवडणुकीचे मतदार असतात.
अहिल्यानगर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींचे एकूण ४६१ सदस्य या निवडणुकीत मतदान करणार आहेत. मात्र जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका झालेल्या नसल्यामुळे तब्बल ९६ मतदार यावेळी मतदान करू शकणार नाहीत.
या निवडणुकीत मतदान हे साध्या पद्धतीने होत नाही. मतदारांना पसंती क्रमाने मतदान करावे लागते. म्हणजे पहिली पसंती, दुसरी पसंती अशा पद्धतीने मत द्यावे लागते. यासाठी मतपत्रिकेचा वापर होणार असून १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल.
मतमोजणी २२ जून रोजी होणार असून २५ जूनपर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. म्हणून मंडळी, आता पुढील काही दिवसांत राजकीय घडामोडींना आणखी वेग येणार आहे.





