
अहिल्यानगरच्या विधान परिषद जागेवरून महायुतीत आता मोठी राजकीय चुरस पाहायला मिळत आहे !
राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा सोडणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. “नगरची जागा आपलीच आहे आणि ती आपल्याकडेच हवी,” अशी ठाम भूमिका पक्षाच्या शिष्टमंडळाने पक्षप्रमुख सुनेत्रा पवार यांच्यासमोर मांडली आहे.
मंडळी, अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेवरून राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा पुन्हा आपल्या पक्षालाच मिळावी, यासाठी थेट पक्षप्रमुख सुनेत्रा पवार यांच्याकडे जोरदार आग्रह धरला आहे.
जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सुनेत्रा पवार आणि समन्वय समिती सदस्य हसन मुश्रीफ यांची भेट घेत “नगरची जागा आपलीच” अशी ठाम भूमिका मांडली. ही जागा मागील तीन पंचवार्षिकांपासून राष्ट्रवादीकडे आहे.
स्वर्गीय अरुणकाका जगताप यांनी याच जागेवर विजय मिळवला होता. त्यामुळे राष्ट्रवादीचा दावा अधिक मजबूत मानला जात आहे. दरम्यान, उमेदवारीसाठी सचिन जगताप आणि माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.
जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी चार आमदार असल्याने आता महायुतीत अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





