Latest

जिल्हा परिषद शाळेतून शिकलेली अहिल्यानगरमधील शेतकरी कन्या बनली क्लास वन अधिकारी

अहिल्यानगरच्या एका शेतकरी कन्येचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास सध्या सर्वत्र चर्चेत आहे. जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेतलेल्या एका मुलीने थेट क्लास वन अधिकारी पदापर्यंत झेप घेत अनेक ग्रामीण मुलींसमोर आदर्श निर्माण केलाय.

मंडळी, नगर तालुक्यातील मांडवे गावच्या सारिका संपत निमसे-सस्ते यांनी एमपीएससी परीक्षेत यश मिळवत गटविकास अधिकारी म्हणजेच क्लास वन अधिकारी पद मिळवले आहे. विशेष म्हणजे त्यांचा हा प्रवास अत्यंत खडतर परिस्थितीतून झालेला आहे.

घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे लवकर नोकरी मिळावी म्हणून त्यांनी डीएडचे शिक्षण घेतले आणि सीईटी परीक्षेतून शिक्षिका म्हणून निवड झाली. नेवासा आणि जामखेड तालुक्यात तब्बल दहा वर्षे त्यांनी शिक्षिका म्हणून काम केले.

पण शिक्षिका म्हणून काम करत असतानाही त्यांचे एक मोठे स्वप्न होते, क्लास वन अधिकारी होण्याचे. त्यामुळे शाळेचे काम, घरची जबाबदारी आणि अभ्यास हे सगळं एकत्र सांभाळत त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत राहिल्या.

या काळात त्यांची सहायक कक्ष अधिकारी आणि विक्रीकर निरीक्षक पदावरही निवड झाली. पण त्यांनी तिथेच न थांबता अभ्यास सुरू ठेवला आणि अखेर एमपीएससी परीक्षेत यश मिळवत गटविकास अधिकारी पदावर नाव कोरले. मंडळी अहिल्यानगरच्या लेकीसाठी एक लाईक तर बनतोच..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button