Explained

Vikas Lawande Attack | Sngram Maharaj Bhandare यांची भूमिका योग्य की अयोग्य?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शनिवारी शाईफेक करण्यात आली. किर्तनकार संग्राम भंडारे महाराज व काही गोरक्षकांनी त्यांच्यावर शाई ओतली. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. त्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. पुण्यातील लोणी काळभोर पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला. नुसती शाईफेकच नाही, तर आपल्यावर पिस्तूल रोखल्याचा आरोपही लवांडे यांनी केला. व्हायरल व्हिडीओत फक्त शाई ओतल्याचे दिसत असल्याने पोलिसांनी आर्म अॅक्टचा गुन्हा नोंदविला नाही. त्यानंतर आ. रोहित पवारांनी थेट लोणी काळभोर पोलिस ठाणे गाठत कलम वाढविण्याची मागणी केली.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लवांडे यांचा दुग्धाभिषेकही केला. दुसरीकडे, आ. निलेश राणे, आ. संग्राम जगताप यांच्यासारख्या हिंदूत्ववादी नेत्यांनी भंडारे महाराजांच्या कृतीचं समर्थन केलं. आता हा वाद येत्या काही दिवस चांगलाच चर्चेत राहिल. आता हे सगळं प्रकरण काय? त्याचा मतितार्थ काय? किर्तन कुणी करावं? लवांडे यांचे आरोप काय? हे सगळं आपण समजून घेऊ…

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते व स्वतः किर्तनकार असलेल्या विकास लवांडे यांनी काही दिवसांपूर्वी खळबळ उडवून दिली होती. वारकरी सांप्रदायात घुसखोरी केली म्हणत त्यांनी प्रतिगामी विचारसरणीच्या 20 महाराजांची यादीच जाहीर केली होती. या यादीत वारकरी सांप्रदायातील अनेक महान व्यक्तींची व महाराजांची नावे होती. नगर जिल्ह्यातील देवगड संस्थानचे सर्वेसर्वा भास्करगिरी महाराज व सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांचेही या यादीत नाव होतं. त्यानंतर नगर जिल्ह्यातील या दोन्ही संत-महंतांना मानणाऱ्या भक्तांमध्ये, प्रचंड रोष पसरला. विकास लवांडे व शरद पवार यांच्या अटकेची मागणीही करण्यात आली.

नेवासा, श्रीरामपूर येथील भक्तगण आक्रमक झाले. राहुरी पोटनिवडणुकीच्या आधी हे सगळं घडल्यामुळे, त्याचा फटका राहुरीच्या निवडणुकीत उभ्या असलेल्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या उमेदवाराला बसला. राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मोकाटे यांचं डिपाँझिटही जप्त झालं. अर्थात, या पराभवाला अजूनही अनेक कारणं असली तरी विकास लवांडे यांचं वक्तव्य हे ही, या पराभवाचं एक कारण होतं, असं बोललं गेलं.

विकास लवांडे यांच्या वक्तव्याचे पडसाद पंढरपूर येथेही पडले. वारकरी सांप्रदायातील संघटना, संतांचे वंशज, सेवेधारी परंपरेचे प्रमुख यांनी तातडीने कबीर मठात बैठक घेऊन लवांडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला. विकास लवांडे व शरद पवार यांना तत्काळ अटक करावी, अशी एकमुखी मागणी या बैठकीत घेण्यात आली. शिवाय अटक न झाल्यास पुढील काही दिवसांत तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. लवांडे यांनी ज्या संतांची नावे जाहीर केली, त्यांच्या पायावर नाक घासून माफी मागावी अशी मागणी या बैठकीत झाली.

वारकरी सांप्रदायात हे सगळं सुरु असताना, राष्ट्रवादीचा शरद पवार गट मात्र लवांडे यांच्या पाठीशी उभा राहिला. त्यामुळे हा वाद गेल्या आठवड्यापासून जास्त धुमसत राहिला. त्यातच शनिवारी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात आळंदी म्हातोबाची येथे लवांडे यांचे प्रवचन होते. या प्रवचनानंतर संग्राम महाराज भंडारे व काही गोरक्षकांनी त्यांच्यावर शाई फेक केली. विकास लवांडे यांच्यावरील शाई हल्ल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला. या व्हिडीओत शाईफेक करणारे संग्राम भंडारे हे विकास लवांडे यांना इशारा देताना दिसत आहेत. “आमचं सर्वस्व आहे ते, तू परत आमच्या गुरुवर्यांना बोललास तर तू लक्षात ठेव”, असं कीर्तनकार संग्राम भंडारे व्हिडीओत बोलताना दिसले.

त्यानंतर पुन्हा वातावरण तापलं. राष्ट्रवादीच्या शरद पवार गट, काँग्रेस व शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या काही नेत्यांनी या घटनेचा निषेध केला. आ. रोहित पवार, बाळासाहेब थोरात, सुप्रीया सुळे, सुषमा अंधारे अशा नेत्यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. परंतु दुसरीकडे, भाजपचे नितेश राणे, आ. संग्राम जगताप यांनी मात्र संग्राम महाराज भंडारे यांचं समर्थन केलं. या घटनेत राजकारण शिरल्याने हा वाद आता चांगलाच पेटणार असल्याची चिन्हे आहेत.

आता या मुद्द्याचा मतितार्थ पाहू…

विकास लवांडे यांच्या मते, त्यांनी ज्या 20 महाराजांची नावे जाहीर केली. ते एका पक्षाला अनुरुप निरुपण करतात. किर्तन प्रवचनात त्यांनी कट्टरतावाद आणला, असा लवांडे यांचा आरोप होता. परंतु किर्तन-प्रवरचण कुणाला करता येतं, याचं उत्तर गुगलवर सर्च केलं तर, जरा वेगळंच येतं. किर्तन-प्रवचन करण्याचा अधिकार फक्त संतांनाच नाही. ही परंपरा संतांनी सुरु केली असली तरी, कालानुरुप ती समाजप्रबोधन व ईश्वरभक्तीचं माध्यम बनली आहे. कीर्तन-प्रवचन करण्यासाठी संत होणं अनिवार्य नाही. तर ठरावीक पात्रता त्यासाठी आवश्यक असते. कीर्तन-प्रवचन करणारी व्यक्ती ‘संत’ नसली तरीही, तिला आध्यात्मिक ज्ञान, वेद-पुराणांचे वाचन, कीर्तन परंपरेचे ज्ञान, आणि वक्तृत्व कला, अवगत असणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रात वेगवेगळ्या किर्तन परंपरा आहेत…

– त्यात सर्वात जुनी असणारी नारदीय किर्तन परंपरा
– संत नामदेव महाराजांनी सुरु केलेली वारकरी किर्तन परंपरा
– समर्थ रामदासांनी सुरु केलेली रामदासी किर्तन परंपरा
– स्वातंत्र्यलढ्यादरम्यान सुरु झालेली राष्ट्रीय प्रबोधन किर्तन परंपरा
– राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुरु केलेली गुरुदेव संप्रदाय किर्तन परंपरा
– संत गाडगेमहाराजांनी ज्या शैलीचा वापर केला ती, सत्यशोधक किर्तन परंपरा

अशा वेगवेगळ्या किर्तन परंपरा आहेत. कीर्तन हे मनोरंजन, भक्ती आणि प्रबोधन यांचा मिलाफ समजलं जातं. संतांचे विचार, धर्म, देश, देव हे सगळे विचार त्याच एकवटवीले जातात. त्यामुळे विकास लवांडे यांच्या भूमिकेचं समर्थन, वारकरी संप्रदायाने केलं नाही. अगदी संतांच्या वंशजांनीही लवांडे यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. लवांडे यांनी वारकरी सांप्रदायात राजकारण आणलं, असाही आरोप झाला. तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गट, अजूनही लवांडे यांच्या भूमिकेवर सक्रीय पाठींबा दर्शवत आहे. हा वाद आता सत्ताधारी व विरोधक अशा दोन गटांत विभागला गेलाय. त्यामुळे तो यापुढेही बराच काळ राहील, अशी शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button