
काही माणसं स्वतःच्या कुटुंबापुरती मर्यादित राहत नाहीत, तर हजारो कुटुंबांच्या सुख-दुःखाचा आधार बनतात. शिर्डीच्या सुमित्रा कोते यांचं कार्यही असंच होतं. त्यांच्या निधनाने शिर्डीने एक सेवाभावी व्यक्तिमत्त्व गमावलं आहे.
सुमित्रा कोते या शिर्डीच्या प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा आणि साईसंस्थानच्या माजी विश्वस्त होत्या. २००१ मध्ये त्यांनी पती कैलासबापू कोते यांच्यासोबत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची सुरुवात केली.
आर्थिक परिस्थितीमुळे मुलींच्या लग्नाचा खर्च पेलू न शकणाऱ्या कुटुंबांना आधार देणं, हा यामागचा उद्देश होता. विशेष म्हणजे, तब्बल २५ वर्षांच्या या प्रवासात सुमारे २५०० जोडप्यांचे विवाह लावण्यात आले.
वधूंना सोन्याचं मंगळसूत्र, लग्नाचे कपडे आणि संसारोपयोगी साहित्यही दिलं जायचं. या उपक्रमातून मुलगा-मुलगी समानता, बेटी बचाव आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला गेला. आज त्यांच्या जाण्याने हजारो मुलींच्या डोक्यावरचा मायेचा हात हरपला आहे.





