
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथील भारती चौधरी यांची ही कहाणी प्रत्येक महिलेला प्रेरणा देणारी आहे. पतीच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. मात्र, परिस्थितीसमोर हार न मानता त्यांनी सासरच्या मंडळींकडून सुरू झालेला खवा-पेढ्यांचा व्यवसाय पुढे सुरू ठेवला.
सुरुवातीला स्वतः बनवलेले पेढे विकताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ग्राहकांचा प्रतिसाद कमी होता, तर विक्रीसाठी जागा मिळवणंही कठीण होतं. पण त्यांनी हार मानली नाही. बाहेरून खवा आणण्याऐवजी स्वतःच शुद्ध खवा तयार करण्याचा निर्णय घेतला. याच निर्णयामुळे त्यांच्या व्यवसायाला नवी दिशा मिळाली.
आज त्या दररोज साधारण पाच ते दहा किलो खवा तयार करतात. मागणी वाढल्यास हे प्रमाण १५ किलोपर्यंत पोहोचतं. त्यांच्या पेढ्यांना प्रतिकिलो ३०० ते ६०० रुपयांपर्यंत दर मिळतो. सण, यात्रा आणि विविध कार्यक्रमांमध्ये विक्री वाढते.
तीन मुली आणि एका मुलाच्या मदतीने त्यांनी संसाराचा गाडा पुढे नेला. संकटातून संधी निर्माण करणाऱ्या भारती चौधरी यांची जिद्द सांगते की, मेहनत आणि चिकाटी असेल तर छोटा व्यवसायही यशाचा मार्ग ठरू शकतो.





