
अहिल्यानगरच्या एका विवाहितेने सासरच्या मंडळींविरोधात गंभीर आरोप केले आहेत. जर्मनीत एमएसचं शिक्षण घेण्यासाठी माहेरून ३० लाख रुपये आणण्याची मागणी केल्याचा आरोप तिने फिर्यादीत केला आहे.
मंडळी, श्वेतांजली यांचा विवाह २७ मे २०२२ रोजी पुण्यातील वेदांत विक्रम म्हस्के यांच्याशी झाला. सुरुवातीचे काही दिवस व्यवस्थित गेल्यानंतर लग्नात अपेक्षेप्रमाणे वस्तू आणि सोने दिले नसल्याचे सांगत त्रास दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर जर्मनीतील शिक्षणासाठी ३० लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात आली.
पतीसोबत जर्मनीला गेल्यानंतरही शिवीगाळ आणि मारहाण झाल्याचा आरोप विवाहितेने केला आहे. पती नोकरी करत नसल्याचेही तिला तेथे समजल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
इतकंच नाही, तर जून २०२४ मध्ये पुण्यात परतल्यानंतर लग्नात मिळालेले १० तोळे सोन्याचे दागिने काढून घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सुरु आहे.





