Explained

सावधान! नगरमध्ये सापडलं लाखोंचं ‘विष’? उपवास करणाऱ्यांच्या जिवावर कोण उठलंय?

सध्या सणासुदीचे दिवस आहेत. नवरात्रोत्सव, उपवास आणि भक्तीचं वातावरण आहे. आपण देवाच्या चरणी लीन होतो. मनोभावे उपवास धरतो. पण विचार करा… ज्या उपवासाच्या पदार्थावर श्रद्धा ठेवून तुम्ही तो तोंडात टाकता, तोच पदार्थ जर तुमच्या कुटुंबाला थेट मृत्यूच्या दारात घेऊन गेला तर? प्रश्न ऐकून धक्का बसला ना… पण हे घडलंय. नगर जिल्ह्यात रोज विषबाधेच्या नवनव्या घटना समोर येताहेत. अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणाऱ्या त्या आहेत. रोज ज्या बातम्या समोर येताहेत, त्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय.

नवरात्रीच्या उपवासाला खाल्लेली भगर… होय, तीच भगर जी आपण दर उपवासाला आवडीने खातो, ती खाल्ल्यामुळे एकाच वेळी जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये तब्बल ३० ते ३५ हून अधिक लोकांना विषबाधा झालीय. यात लहान मुलं, महिला आणि वृद्धांचा समावेश आहे. पण हा केवळ एक अपघात आहे की महाराष्ट्राच्या अन्न बाजारपेठेत चाललेला एक जीवघेणा काळाबाजार? आजच्या या विशेष विश्लेषणात आपण याच प्रकरणाचा सविस्तर धांडोळा घेणार आहोत…

आजच्या विषयाचा संपूर्ण घटनाक्रम काय आहे, हे आधी समजून घेऊयात… ही घटना एका विशिष्ट भागापुरती मर्यादित नाही, तर नगर जिल्ह्यातील तीन ते चार वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये एकाच वेळी हा प्रकार उघडकीस आला आहे.

पहिले केंद्र ठरलं राहुरी तालुका :

राहुरी शहर, येवले आखाडा, राहुरी फॅक्टरी आणि वाघाचा आखाडा या परिसरातून सर्वाधिक रुग्ण समोर आले. नवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी नागरिकांनी घरात भगरीची भाकरी बनवली. पण जेवण झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच… खेळती-बाळगती माणसं अंथरुण धरु लागली. त्यांना तीव्र मळमळ, उलट्या, जुलाब आणि भयंकर चक्कर येऊ लागली. राहुरीतील खाजगी आणि शासकीय रुग्णालये एकाच वेळी रुग्णांनी भरून गेली. काही जणांची प्रकृती इतकी खालावली की त्यांना तातडीने अहिल्यानगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवावं लागलं.

दुसरं केंद्र – श्रीगोंदा तालुका:

श्रीगोंदा फॅक्टरी परिसरात देखील असाच खळबळजनक प्रकार घडला. इथे वेगवेगळ्या कुटुंबातील सुमारे १५ जणांना हाच त्रास झाला. जेव्हा या सर्वांची चौकशी करण्यात आली, तेव्हा एक धक्कादायक समान दुवा समोर आला. या सर्व वेगवेगळ्या कुटुंबांनी गावातील एकाच दुकानातून उपवासाची भगर खरेदी केली होती! म्हणजेच, विष दुकानातूनच विकलं जात होतं.

तिसरं केंद्र – पाथर्डी तालुका:

पाथर्डी तालुक्यातील वामन भाऊ नगरमधूनही अशीच बातमी आली. रेडीमेड भगरीच्या पिठाची भाकरी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ ते ६ जणांना विषबाधा झाली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावं लागलं. सध्या या सर्व बाधितांवर स्थानिक डॉक्टर्स आणि जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथक शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सुदैवाने, वेळेवर उपचार मिळाल्याने सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, पण या घटनेने निर्माण केलेला भीतीचा थरार अजूनही कायम आहे.

जिल्ह्यात एकामागून एक रुग्ण रुग्णालयात दाखल होऊ लागल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले. जिल्हाधिकारी आणि अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA चे पथक तातडीने ॲक्शन मोडमध्ये आले. कारण प्रश्न एका तालुक्याचा नव्हता, तर संपूर्ण जिल्ह्याचा होता. जर ही भगर बाजारात तशीच राहिली असती, तर बाधितांचा आकडा शेकडो-हजारोंमध्ये गेला असता. त्यामुळे एफडीएच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली आणि या भगरीचे मूळ शोधण्यास सुरुवात केली. हे मूळ कुठे सापडलं माहितीये? अहिल्यानगर शहरातील दाळमंडई भागात!

होय, दाळमंडई हा शहराचा मुख्य व्यापारी भाग आहे. तिथल्या मोठ्या गोदामांवर आणि व्यापाऱ्यांवर एफडीएने थेट छापे टाकले. या कारवाई दरम्यान पथकाने काय केलं? तर:

* १ लाख ९ हजार रुपयांची संशयास्पद भगर जप्त केली.
* एकूण ५३६ किलो भगरीचा साठा तातडीने सील करण्यात आला.

प्रशासनाने केवळ माल जप्त केला नाही, तर या भगरीचे नमुने गोळा करून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. हा अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल की, या भगरीमध्ये नेमकी कोणती भेसळ करण्यात आली होती किंवा हा साठा किती जुना आणि कुजलेला होता. व्यापाऱ्यांनी पैशाच्या हव्यासापोटी लोकांच्या जीवाशी खेळ मांडल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जातोय.

मित्रांनो, हा केवळ एका जिल्ह्याचा प्रश्न नाही. महाराष्ट्रात दरवर्षी उपवासाच्या काळात अशा अनेक घटना समोर येतात. पण कधी विचार केलाय का, की भगर खाल्ल्याने विषबाधा नेमकी का होते? यामागे दोन मुख्य शास्त्रीय आणि व्यापारी कारणं आहेत :

पहिले कारण –

कोडो मिलिटची भेसळ :

आपण जी भगर खातो त्याला ‘वरई’ म्हणतात. पण बाजारात नफा कमावण्यासाठी काही व्यापारी त्यात ‘कोडो मिलिट’ची भेसळ करतात. कोडो मिलिटमध्ये ‘सायक्लोपिॲझोनिक ॲसिड’ नावाचं नैसर्गिक टॉक्सिन किंवा विष असतं. जर ती भगर नीट साफ केली नाही, तर मानवी शरीरात हे विष जाऊन थेट मज्जासंस्थेवर आणि पोटावर हल्ला करतं.

दुसरे कारण –

बुरशी आणि चुकीची साठवणूक :

भगर जर दमट किंवा ओलसर जागी साठवून ठेवली, तर त्याला ‘अर्गट’ किंवा इतर घातक बुरशी लागते. ही बुरशी पिठात दळली जाते आणि त्यातून ‘मायकोटॉक्सिन’ तयार होतं, जे माणसाला रुग्णालयात पोहोचवण्यासाठी पुरेसं असतं.

आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न… सामान्य नागरिकांनी स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा जीव कसा वाचवायचा? बाजारात गेल्यावर चांगली आणि विषारी किंवा भेसळयुक्त भगर कशी ओळखायची? अन्न सुरक्षा विभागाने दिलेल्या या काही सोप्या टिप्स नेहमी लक्षात ठेवा :

१. उघडी भगर किंवा पीठ खरेदी करणे टाळा :
नेहमी नामांकित ब्रँडची, आयएसओ किंवा एफएसएसएआय चा परवाना आणि लोगो असणारी पॅकबंद भगरच खरेदी करा.

२. एक्सपायरी डेट तपासा :
पाकिटावरची मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेट आवर्जून पहा. जुना साठा कधीही घेऊ नका.

३. वास आणि रंग तपासा :
भगर किंवा त्याचे पीठ हातात घेऊन त्याचा वास घ्या. जर त्याला बुरशीसारखा, जुनाट किंवा रासायनिक वास येत असेल, तर ती भगर अजिबात वापरू नका. चांगल्या भगरीला एक नैसर्गिक, फ्रेश वास असतो.

४. पाण्याचा रंग बदलतो का पहा :
भगर पाण्यात टाकल्यावर जर पाणी प्रमाणाबाहेर पांढरं किंवा मळकट होत असेल, तर त्यात स्टार्च किंवा पावडरची भेसळ असण्याची शक्यता असते.

अहिल्यानगर जिल्ह्यात घडलेली ही घटना आपल्या सर्वांसाठी एक धोक्याची घंटा आहे. सण-उत्सव साजरे करताना, उपवास करताना आरोग्याशी तडजोड करू नका. व्यापारी बांधवांनाही आमची हात जोडून विनंती आहे की, सणासुदीच्या काळात थोड्याशा फायद्यासाठी आरोग्याशी खेळू नका, अन्नात भेसळ करणे हा कायद्याने गुन्हा तर आहेच, पण मानवतेच्या दृष्टीने हा सर्वात मोठा पाप आहे. तुम्हाला किंवा तुमच्या परिसरात कोणालाही भगरीतून किंवा इतर अन्नातून त्रास होत असल्याचे जाणवल्यास, तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात संपर्क साधा आणि एफडीएच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button