अहिल्यानगरच्या राजकारणात अनेक अशी नावं आहेत, ज्यांचा दबदबा मुंबईच्या मंत्रालयापर्यंत राहिलाय. त्यापैकीच एक होते, ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर. कोणतीही राजकीय घटना असो किंवा थेट निवडणूक असो… कोतकर चर्चेत येतातच. हेच कोतकर बुधवारी १४ ऑक्टोंबरला पुन्हा चर्चेत आले. कारण होतं, त्यांच्या निवासस्थावर व त्यांच्या व्यवसायावर आयकर विभागाने टाकलेल्या धाडी…
१४ ऑक्टोबरच्या सकाळी एकाच वेळी आयकर विभागाने कोतकरांच्या घर आणि ‘हॉटेल संदीप’ व ‘हॉटेल सचिन’ वर थेट धाड टाकली. ज्या कुटुंबाकडे स्वतःच्या मालकीची दोन दोन हेलिकॉप्टर्स आहेत, ज्या कुटुंबाचा शब्द केडगावात कायदा मानला जायचा, त्यांच्यावर ही मोठी कारवाई का झाली? हा प्रश्न सकाळपासून चर्चेत आलाय. कोण आहेत हे कोतकर? एका सामान्य हॉटेल व्यवसायापासून ते थेट खाजगी विमानांच्या ताफ्यापर्यंतचा त्यांच्या प्रवास कसा आहे?
कोतकर कुटुंबाच्या सत्तेचा पाया रचला तो भानुदास एकनाथ कोतकर यांनी. नगर तालुका बाजार समितीचे माजी सभापती आणि काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष म्हणून भानुदास कोतकरांनी केडगाव परिसरात आपली पकड मजबूत केली. ९० च्या दशकात त्यांनी केडगाव आणि आसपासच्या ग्रामीण भागात आपला गट तयार केला आणि पाहता पाहता ते नगरच्या राजकारणातील एक मोठे केंद्र बनले.
नगर उत्तरेचं राजकारण सहकाराचं आहे. सहकारातील सगळेच नेते एकमेकांचे पाहुणे-रावळे आहेत. नगरच्या याच नात्यागोत्याची चर्चा थेट दिल्लीपर्यंत असते. हे कोतकरांनी ओळखलं. शहरात किंवा दक्षिणेत राजकारण करायचं म्हटल्यावर नात्यागोत्यालाही महत्त्व आहेच, हे त्यांनी जाणलं. त्यातूनच सुरुवातीला कोतकर-कर्डिले व त्यानंतर कोतकर-कर्डिले-जगताप-गाढे हे नातंगोतं तयार झालं. नगर शहर व तालुक्याच्या राजकारणात ही सगळी कुटुंब वेगवेगळ्या पक्षात असले, तरी एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. यांच्याशिवाय नगरच्या राजकारणाचं पानही हालत नाही, ही वस्तूस्थिती आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले हे या संपूर्ण समीकरणाचे ‘किंगमेकर’ मानले जातात. कारण, कर्डिलेंच्या तीन मुलींपैकी एका मुलीचा विवाह काँग्रेसचे भानुदास कोतकर यांचे सुपुत्र संदीप कोतकर यांच्याशी झाला. दुसऱ्या मुलीचा विवाह राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी झाला, तर तिसऱ्या मुलीचा विवाह गाढे परिवारात झाला. म्हणजेच, पक्षात कितीही वाद असले, तरी नगर शहराची व केडगावच्या सत्तेची सूत्रं शेवटी या नात्यांच्या जाळ्यातच फिरत राहिली.
भानुदास कोतकरांनी आपली राजकीय गादी आपल्या मुलांना सोपवली. त्यांचे सुपुत्र संदीप कोतकर यांनी अत्यंत कमी वयात नगर पालिकेच्या राजकारणात एन्ट्री घेतली. केवळ एन्ट्रीच घेतली नाही, तर तरुण वयात ते अहिल्यानगरचे महापौर देखील बनले. संदीप कोतकर यांच्या पाठोपाठ त्यांचे भाऊ सचिन आणि अमोल कोतकर हेही व्यवसायात आणि पडद्यामागच्या राजकारणात सक्रिय झाले.
आता प्रश्न येतो की, कुटुंबातील महिला म्हणजेच सूनबाई राजकारणात कशा आल्या? जेव्हा संदीप कोतकर यांच्यावर कायदेशीर अडचणी आल्या, तेव्हा केडगावचा हा बालेकिल्ला आपल्याच हातात राहावा, यासाठी कौटुंबिक रणनीती आखली गेली. संदीप कोतकर यांच्या पत्नी आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या कन्या सुवर्णा कोतकर यांना राजकारणात उतरवण्यात आलं. सुवर्णा कोतकर यांनी केडगावातून निवडणूक जिंकली आणि त्या नगरच्या उपमहापौर बनल्या. कौटुंबिक वारसा, वडिलांचं राजकीय वजन आणि पतीची केडगावातील ताकद यांच्या जोरावर सुवर्णा कोतकर यांनी अल्पावधीतच नगरच्या राजकारणात स्वतःचा मोठा दबदबा निर्माण केला. अगदी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांच्या नावाची मोठी चर्चा रंगली होती.
पण म्हणतात ना, सत्तेची अफाट ताकद अनेकदा मोठ्या संकटांना आमंत्रण देते. कोतकरांच्या या राजकीय साम्राज्याला पहिली मोठी गळती लागली ती २००८ मधील अशोक लांडे खून प्रकरणामुळे! शेवगावचे लॉटरी विक्रेते अशोक लांडे यांच्या हत्येप्रकरणी भानुदास कोतकर आणि त्यांची तीन मुले– संदीप, सचिन व अमोल यांच्यावर थेट गुन्हे दाखल झाले. या खटल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. २०१६ मध्ये नाशिकच्या सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत भानुदास कोतकर आणि त्यांच्या तिन्ही मुलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. एकाच वेळी घरातील चार प्रमुख पुरुष तुरुंगात गेल्याने कोतकर साम्राज्य संपणार असं वाटत होतं. पण नंतर प्रकृतीच्या कारणास्तव भानुदास कोतकर जामिनावर बाहेर आले. पण संकटं इथेच थांबली नाहीत!
७ एप्रिल २०१८ रोजी केडगावमध्ये पुन्हा एक दुहेरी हत्याकांड घडलं. शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याकांडाचे धागेदोरे थेट कोतकर कुटुंबापर्यंत पोहोचले. सीआयडीच्या तपासात असा आरोप करण्यात आला की, तुरुंगात असलेला संदीप कोतकर आणि बाहेर असलेली त्याची पत्नी सुवर्णा कोतकर हे फोनवरून संपर्कात होते आणि हा संपूर्ण कट रचण्यात आला होता. या प्रकरणानंतर सुवर्णा कोतकर अनेक महिने फरार होत्या, पुढे त्यांनी न्यायालयात शरण येत सशर्त जामीन मिळवला.
एकीकडे कोर्ट-कचेऱ्या, गुन्हेगारीचे आरोप आणि तुरुंगवास सुरू असताना, दुसरीकडे कोतकर कुटुंबाचा आर्थिक आलेख आणि त्यांचा ‘रॉयल रुबाब’ मात्र थक्क करणारा होता. कोतकरांचा मूळ व्यवसाय म्हणजे हॉटेलिंग आणि कन्स्ट्रक्शन. अहिल्यानगर-पुणे हायवेवर असलेले त्यांचे ‘हॉटेल संदीप’ आणि ‘हॉटेल सचिन’ हे नगरकरांसाठी आणि हायवेवरून जाणाऱ्यांसाठी एक मोठे लँडमार्क आहेत. जिल्ह्यातील बड्या बड्या नेत्यांना आणि उद्योगपतींना जे जमलं नाही, ते या कोतकर कुटुंबाने करून दाखवलं. वर्ष २०२५ मध्ये कोतकर कुटुंबाने थेट स्वतःच्या मालकीचे पहिले खाजगी हेलिकॉप्टर खरेदी केले! हे हेलिकॉप्टर जेव्हा नगरच्या मातीवर उतरलं, तेव्हा त्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली. पण कोतकर इथेच थांबले नाहीत.
अवघ्या एक वर्षाच्या आत, म्हणजेच जून २०२६ मध्ये माजी महापौर संदीप कोतकर यांनी त्यांच्या ताफ्यात आणखी एका आलिशान, दुसऱ्या हेलिकॉप्टरची भर घातली. स्वतःच्या मालकीची दोन-दोन हेलिकॉप्टर्स बाळगणारे कोतकर हे जिल्ह्यातील कदाचित पहिलेच राजकीय कुटुंब ठरले. एका सामान्य कुटुंबातून सुरू झालेला प्रवास थेट खाजगी एव्हिएशन ताफ्यापर्यंत पोहोचल्याने, त्यांच्या आर्थिक श्रीमंतीबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात आश्चर्य व्यक्त केले जात होते.
पण मित्रांनो, जेव्हा संपत्ती अफाट वाढते, तेव्हा केंद्रीय यंत्रणांची नजर देखील तिच्यावर पडते. आजची आयकर विभागाची धाड ही याच अथांग संपत्तीच्या स्त्रोतांचा शोध घेण्यासाठी असल्याचे बोलले जात आहे. कोतकरांच्या केडगावमधील निवासस्थानासह, त्यांचे हॉटेल्स आणि इतर व्यावसायिक कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची कसून पडताळणी केली. गेल्या काही काळातील जमिनींचे व्यवहार, हॉटेल्समधून होणारी उलाढाल आणि थेट दोन हेलिकॉप्टर्स खरेदी करण्यासाठी आलेला पैसा… या सर्वांचा हिशोब आता आयकर विभाग तपासत आहे.
आता या कारवाईत नेमके काय समोर येते, हे काही वेळात कळेलच. परंतु या धाडीमुळे कोतकर कुटुंबाला चांगलाच धक्का बसला. केडगावच्या सत्तेचे राजे राहिलेले कोतकर या आयकर विभागाच्या चक्रव्यूहातून सुखरूप बाहेर पडणार का? की या धाडीतून त्यांच्या साम्राज्याचे काही नवीन गुपिते समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तुम्हाला काय वाटते, कोतकरांवर झालेली ही कारवाई केवळ आर्थिक आहे की यामागे काही राजकीय समीकरणे आहेत?





