Explained

सोनई तिहेरी हत्याकांड : ३ मृतदेह, ५ फाशीचे कैदी अन् २०२६ मधील सर्वात मोठा ट्विस्ट!

१ जानेवारी २०१३… संपूर्ण जग नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष करत होतं. पण नगर जिल्ह्यातील सोनई जवळच्या एका वस्तीवरील विहीर, कुपनलिका आणि सेप्टिक टँकमधून ३ तरुणांचे छिन्नविछिन्न मृतदेह बाहेर काढले जात होते. या मृतांची नावे होती, सचिन घारू, संदीप थनवार आणि राहुल कंडारे… सुरुवातीला “सेप्टिक टँक साफ करताना गुदमरून एका कामगाराचा मृत्यू झालाय…” एवढीच तोंडी माहिती सोनई पोलिसांना दिली गेली होती. पण… पण, जेव्हा पोलिसांनी सेफ्टी टँकची पाहणी केली, तेव्हा ६ फूट उंचीच्या धिप्पाड शरीरयष्टीच्या संदीप थनवार या कामगाराचा मृतदेह अवघ्या २ फूट पाण्यात सापडला. त्याचे हात-पाय बांधलेले आढळले.

हा अपघात नक्कीच नव्हता. मग नक्की काय होतं? पोलिस संदीपच्या हत्येनं गोंधळलेले असतानाच, त्याच्यासोबत आलेल्या इतर दोन कामगारही बेपत्ता असल्याचं पोलिसांना समजलं. आणि पुढच्या काही तासांतच, महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात क्रूर आणि थरारक ‘ऑनर किलिंग’चा कट उघड झाला! काय होतं सोनईतलं हे तिहेरी हत्याकांड प्रकरण? १३ वर्षानंतर या प्रकरणाचं पुढं काय झालं? आणि आरोपींच्या फाशीला विलंब का लागतोय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आमचा हा प्रयत्न…

मित्रांनो, कोपर्डी हत्याकांडातील आरोपींच्या फाशीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश २ सप्टेंबरला कोपर्डीतील घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. कोपर्डी हत्याकांडानं त्यावेळी महाराष्ट्र हादरला होता. असंच आणखी एक हत्याकांड नगर जिल्ह्यात घडलं होतं. ते होतं, सोनईतील तिहेरी हत्याकांड… कोपर्डीच्या हत्याकांडामुळं आता सोनईतील तिहेरी हत्याकांडही चर्चेत आलंय.

सोनईतील तिहेरी हत्याकांडाचा पाया रचला गेला होता, एका आंतरजातीय प्रेमप्रकरणातून… सोनई जवळील गणेशवाडी-विठ्ठलवाडी शिवारात राहणाऱ्या दरंदले आडनावाच्या कुटुंबातील एक वीस वर्षांची मुलगी, नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती शिक्षण संस्थेत बीएडचे शिक्षण घेत होती. याच संस्थेत २४ वर्षीय सचिन सोहनलाल धारू हा सफाई कामगार म्हणून काम करत होता. तो मूळचा मध्य प्रदेशमधील खांडवा चा. सचिनचे व या मुलीचे प्रेमसंबंध जुळल्याच्या चर्चा सुरु झाल्या. याच शिक्षण संस्थेत काम करणाऱ्या या जेसीबी ड्रायव्हरनं, या दोघांना एकत्र पाहिलं. हा जेसीबी ड्रायव्हर, दरंदले कुटुंबाच्या नात्यातला होता. नंतर त्यानच या कथित प्रेमप्रकरणाची माहिती दिली, मुलींच्या घरच्यांना दिल्याचं पोलिस तपासात समोर आलं.

हे ऐकून मुलीच्या घरचे हादरले. मुलगा खालच्या जातीतल्या असल्यानं समाजात आपली बदनामी होईल, या भितीनं सवर्ण कुटुंबात खळबळ उडाली. पहिल्यांदा सचिनला समजून सांगून व दम देऊन पाहिला गेला. परंतु तरीही हे थांबलं नसल्यानं, अखेर सचिनला संपवणं, हा एकच पर्याय या कुटुंबासमोर होता. सगळ्यात मोठा प्रश्न होता, सचिनला संपवायचं कसं..? याच प्रश्नातून जन्माला आलं, एक भयानक हत्याकांड…

सचिन हा, संदीप धनवारसोबत काँलेजमध्ये काम करत होता. बाहेरील कामे हे दोघे एकत्र करतात, हे आरोपींना समजलं. सचिनला संपवायचं, म्हणजे त्याला काँलेजमधून बाहेर बोलावणं, महत्त्वाचं होतं. आरोपींनी सचिनचा मित्र असलेल्या संदीपशी संपर्क केला. गणेशवाडी-विठ्ठलवाडी परिसरातील स्वच्छतागृहाची टाकी साफ करायची आहे असं सांगून, संदीपला विठ्ठलवाडी शिवारात बोलावण्यात आलं. सहाजिकच, हे काम संदीप एकटं करणार नव्हता. सचिनही त्याच्यासोबत येणार होता. झालंही तसंच…

तारीख होती १ जानेवारी २०१३….टाकी साफ करण्यासाठी संदीप, सचिन व त्यांचा तिसरा मित्र राहुल कंडारे हे तिघे सकाळी १० वाजता नेवासा फाटा येथून विठ्ठलवाडीला आले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत या तिघांनीही दरंदले वस्तीवरील स्वच्छतागृहाच्या टाक्या साफ करण्याचं काम केलं. काम पूर्णत्वास आलं असतानाच, आरोपींनी पहिल्यांदा सेफ्टी टॅक साफ करणाऱ्या संदीप थनवारवर हल्ला केला. संदीप हा सहा फूट उंचीचा व धडधाकट होता. त्यामुळं त्याला त्याच टँकच्या पाण्यात बुडवून ठारण्याचा प्लॅन आखला गेला. संदीपचे हातपाय बांधून त्याला त्याच टाकीच्या पाण्यात उलट लटकवून मारण्यात आलं.

हा प्रकार राहुल कंडारे याने पाहिला. जीवाच्या भितीनं तो शेतातून पळत असतानाच आरोपींनी त्याला पकडलं. ऊस तोडण्याच्या कोयत्यानं त्याच्या मानेवर मागून वार करण्यात आला. हा वार वर्मी लागल्यानं राहुलचा जागीच मृत्यू झाला. आता मुख्य टार्गेट होतं, सचिनला मारण्याचं… खरं तर, सचिनविषयीच या आरोपींच्या मनात राग होता. हे सगळं पाहिल्यावर सचिनही पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. परंतु आरोपींनी त्याचा पाठलाग करुन त्यालाही पकडलं. गट नं. २९८/२ या शेतात नेऊन सचिनला वैरण कापण्याच्या अडकित्त्यात लटकवण्यात आलं. पहिल्यांदा दोन्ही पाय व नंतर दोन्ही हात कापण्यात आले. नंतर त्याची मान अडकीत्यात घालून ती धडापासून वेगळी करण्यात आली.

आता या तिन्ही मृतदेहांची विल्हेवाट कशी लावायची, हा प्रश्न होता. सचिन धारु याचे कापलेले दोन्ही हात, दोन्ही पाय, मुंडके व धड हे शेतातीलच एका उघड्या बोअरवेलमध्ये टाकण्यात आले. राहुल कंडारे याचा मृतदेह दरंदले कुटुंब वाट्याने करत असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतातील कोरड्या ४० फुट खोल विहिरीत खड्डा घेऊन त्यात पुरण्यात आला. दोन मृतदेहांची वाट लावण्यात आली. त्यानंतर आरोपींनी रक्ताने माखलेले कपडे काढून ते एकत्रित जाळून पुरावे नष्ट केले. आता राहिला होता, तो फक्त संदीप धनवार याचा मृतदेह… तो मृतदेह तसाच सेफ्टी टँकमध्ये ठेवण्यात आला. रात्री दीड वाजेच्या सुमारास आरोपींपैकी दोघांनी, थेट सोनई पोलिस ठाणं गाठलं.

स्वच्छतागृहाचे काम करत असताना, आमच्या वस्तीवर एका कामगाराचा श्वास गुदमरुन मृत्यू झाल्याचं या दोघांनी सोनई पोलिसांना तोंडी सांगितलं. सोनई पोलिसांनी तातडीनं घटनास्थळ गाठलं. फक्त एकच मृतदेह सापडला. परंतु दुसऱ्या दिवशी एक-एक साखळी उघड होऊन तिघांचेही मृतदेह हाती लागले. जसजसा घटनाक्रम पुढं सरकत गेला, तशी सोनई पोलिसांच्या दप्तरी वेगवेगळ्या नोंदी होऊ लागल्या. तोपर्यंत या तिघांच्याही नातेवाईंकांनी खून झाल्याच्या शंका व्यक्त केल्या. पोलिसांवरील दबाव वाढला, आणि अकस्मात मृत्यूच्या नोंदीची कथा बदलू लागली.

सगळा घटनाक्रम पाहिला तर, कोणताही माणूस सांगू शकत होता की, हा अपघात नाही… हा अत्यंत थंड डोक्याने केलेला क्रूर नरसंहार आहे! या प्रकरणातील सोनई पोलिसांच्या तपासाची दिशा, सुरुवातीची संशयाच्या भोवऱ्यात अडकली. परंतु नंतर पीडित कुटुंबांनी व काही सामाजिक संघटनांनी हे प्रकरण उचलून धरलं. पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला बोलावण्यास उशीर केला, घटनास्थळाचे पुरावे नीट जतन केले नाहीत, असा आरोप करण्यात आला. जर हा अपघात होता, तर मृतदेहाचे तुकडे कसे झाले?

विहिरीत कापलेले अवयव कुणी फेकले?” या प्रश्नांनी संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. दलित संघटनाही रस्त्यावर उतरल्या. मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांनी नकार दिला. शेवटी, हे प्रकरण अंगाशी येणार हे लक्षात आल्यावर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर, सोनई पोलिसांनी ७ आरोपींविरुद्ध खून, गुन्हेगारी कट आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

यावेळी महाराष्ट्राचे गृहमंत्री होते, आर. आर. पाटील. त्यांनी या प्रकरणात मोठा निर्णय घेतला. या केसचा तपास सीआयडीकडं देण्यात आला. शिवाय प्रसिद्ध विशेष सरकारी वकील, ॲड. उज्ज्वल निकम यांच्याकडे ही केस सोपवली गेली..! सुरक्षेच्या कारणास्तव हा खटला नगरवरून नाशिकच्या विशेष सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला. ॲड. उज्ज्वल निकम यांनी केस हातात घेताच पहिल्या दिवसापासून सोनई पोलिसांच्या तपासातील त्रुटी भरून काढण्यास सुरुवात केली. निकम यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान होतं की, या केसमध्ये कोणताही ‘थर्ड पार्टी’ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. गुन्हा रात्रीच्या अंधारात, आरोपींच्या स्वतःच्या शेतात घडला होता. पण अॅड. निकम यांनी ‘परिस्थितीजन्य पुराव्यांची’ अशी काही साखळी तयार केली, ज्यामुळे आरोपींचा सुटण्याचा मार्ग कायमचा बंद झाला.

खटल्यादरम्यान तब्बल ५४ साक्षीदार तपासण्यात आले. ॲड. उज्ज्वल निकम यांनी कोर्टासमोर जे पुरावे मांडले, ते खालीलप्रमाणे होते :

१. लास्ट सीन थिअरी :
पीडित तरुण शेवटच्या वेळी दरंदले यांच्या शेताकडे जाताना गावातील काही लोकांनी पाहिले होते.

२. फॉरेन्सिक आणि वैद्यकीय पुरावे :
सचिनच्या छातीवरील मुलीच्या नावाचा टॅटू हा सर्वात मोठा पुरावा ठरला, ज्याने हत्येचा हेतू स्पष्ट केला. मृतदेहांचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी सिद्ध केले की हा मृत्यू गुदमरून नाही, तर धारदार शस्त्राने झाला आहे.

३. रक्ताचे डाग आणि हत्यारे :
आरोपींच्या कपड्यांवर आणि हत्येसाठी वापरलेल्या कुऱ्हाड-विळ्यावर पीडितांचे DNA जुळले.

४. ॲड. उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात गाजलेला युक्तिवाद :
न्यायालयात युक्तिवाद करताना ॲड. उज्ज्वल निकम म्हणाले होते, “हे कृत्य केवळ कोल्ड ब्लडेड नाही, तर ‘फ्रोजन ब्लडेड मर्डर’ म्हणजेच गोठलेल्या मेंदूने केलेला खून आहे. या नराधमांच्या कृत्याने रामायणातील राक्षसांची आठवण करून दिली आहे. केवळ जातीय विद्वेषातून तीन निरपराध तरुणांचे तुकडे करण्यात आले. हा समाजाच्या विवेकबुद्धीला लागलेला कलंक आहे.”

पाच वर्षांच्या प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर, १५ जानेवारी २०१८ रोजी नाशिक सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी ६ आरोपींना दोषी ठरवलं. आणि २० जानेवारी २०१८ रोजी कोर्टाने ऐतिहासिक निकाल दिला – सहाही दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली!

फाशीची शिक्षा झालेल्यांमध्ये-
पोपट ऊर्फ रघुनाथ दरंदले,
रमेश दरंदले,
प्रकाश दरंदले,
गणेश दरंदले,
अशोक नवगिरे
आणि संदीप कुऱ्हे

यांचा समावेश होता. यानंतर हे प्रकरण हायकोर्टात गेले. डिसेंबर २०१९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने यातील ५ आरोपींची फाशी कायम ठेवली, तर अशोक नवगिरे या एका आरोपीला पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केलं. उच्च न्यायालयाने म्हटले की, “हा गुन्हा ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ प्रकरणांमध्ये मोडतो, त्यामुळे यांना जगण्याचा अधिकार नाही.

हायकोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली, पण या केसमध्ये सर्वात मोठा कायदेशीर ट्विस्ट सर्वोच्च न्यायालयात आला. हायकोर्टाच्या निकालानंतर, मुख्य सूत्रधार पोपट ऊर्फ रघुनाथ दरंदले याचा नाशिक जेलमध्येच मृत्यू झाला. उर्वरित ४ आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २०२१ मध्ये आरोपींच्या फाशीच्या अंमलबजावणीला अंतरिम स्थगिती दिली. आणि आज २०२६ मध्येही, ही स्थगिती कायम आहे. याचा अर्थ असा की, हे चारही दोषी आरोपी सध्या नाशिक मध्यवर्ती कारागृहात आहेत. सर्वोच्च न्यायालयात अंतिम अपिलावर अजूनही सुनावणी प्रलंबित आहे. घटना घडून १३ वर्षे झाली, सत्र आणि उच्च न्यायालयाने फाशी दिली, तरीही तांत्रिक आणि कायदेशीर प्रक्रियेमुळे अंतिम न्याय मिळायला उशीर झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button