
अहिल्यानगर शहरात व्यवसायासाठी मोक्याच्या जागा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होत आहे. महापालिकेने शहर आणि उपनगरांमध्ये पाच व्यापारी संकुले उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, यातील तीन प्रकल्प खासगी भागीदारीत, तर दोन प्रकल्प कर्जाच्या माध्यमातून उभारले जाणार आहेत.
सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौक, नगर-मनमाड महामार्गावरील सावेडी गावठाण आणि गंजबाजार येथे तीन व्यापारी संकुले उभारण्याचे नियोजन आहे. हे प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी आणि संयुक्त विकास तत्त्वावर विकसित केले जाणार आहेत. यासाठी इच्छुक गुंतवणूकदारांकडून २५ नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
दुसरीकडे, नेहरू मार्केट आणि सर्जेपुरातील रंगभुवन या दोन प्रकल्पांसाठी कर्ज घेतले जाणार आहे. नेहरू मार्केटचे काम सुरू झाले असून, महापालिकेने बँकांकडून कर्जाचे प्रस्ताव मागविले आहेत. कर्ज मंजूर झाल्यानंतर २५ टक्के रक्कम शासनाच्या अर्बन चॅलेंज फंडातून मिळणार आहे.
या प्रकल्पांमुळे व्यापाऱ्यांना गाळे उपलब्ध होण्यासह शहराच्या व्यावसायिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.





