
गंभीर गुन्ह्यांमध्ये नाव असलेला आणि अनेक दिवसांपासून पोलिसांना चकवा देणारा आरोपी अखेर गजाआड झाला आहे. श्रीरामपूर शहर पोलिसांच्या तपास पथकाने इरफान मैनुद्दीन सय्यद उर्फ इप्या याला अटक केली आहे.
मिल्लतनगर परिसरात राहणाऱ्या इरफानविरोधात शहर पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. दरम्यान, तो सूतगिरणी फाटक परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी सापळा रचला. पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम आणि त्यांच्या पथकाने कारवाई करत इरफान सय्यदला ताब्यात घेतले. त्यानंतर संबंधित गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली.
पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे फरार आरोपीला पकडण्यात यश आले. श्रीरामपूर पोलिसांच्या या कारवाईनंतर परिसरात चर्चेला उधाण आले आहे.





