
देशातील पहिल्याच आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सहभागाने रंगलेल्या कॉर्फबॉल प्रीमियम लीगमध्ये अहिल्यानगरचा दिशान किशोर गांधी याने दमदार कामगिरी करत शहराचे नाव देशाच्या राजधानीत पोहोचवले.
दिशानचा सहभाग असलेल्या दिल्ली धुरंधर संघाने स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. दिल्लीतील त्यागराज इनडोअर स्टेडियममध्ये तब्बल १६ दिवस चाललेल्या या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले होते.
देश-विदेशातील ११६ खेळाडूंच्या सहभागाने रंगलेल्या या स्पर्धेत दिल्ली धुरंधरने सलग सात सामने जिंकत विजेतेपदावर आपली मोहर उमटवली.
या यशात दिशानच्या भक्कम बचावाची भूमिका महत्त्वाची ठरली. प्रत्येक सामन्यात त्याने बचावाची मजबूत भिंत उभी करत विरोधी संघांना गोल करण्यापासून रोखले.
अंतिम सामन्यातही समयसूचक आक्रमण आणि प्रभावी संरक्षणाच्या जोरावर त्याने संघाच्या विजयात योगदान दिले. दिशानच्या खेळाचे तज्ज्ञ, सहकारी आणि प्रेक्षकांनी कौतुक केले.
विजेत्या संघाला अभिनेता मनोज तिवारी यांच्या हस्ते ट्रॉफीसह तब्बल ३१ लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले. दरम्यान, अहिल्यानगरच्या या खेळाडूची कामगिरी आता चर्चेचा विषय ठरली आहे !





