२७५ किलोमीटरचा प्रवास… पोटात एक निष्पाप जीव… आणि रात्रीच्या अंधारात पेटवून दिलेला एका गर्भवतीचा जिवंत देह..! होय, तुम्ही बरोबर ऐकलं, जिवंत देह..! अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडमधून सुरू झालेली एक कहाणी धुळ्याच्या निर्जन डोंगरावर एका भीषण क्राईम सस्पेन्सने संपते. ही गोष्ट केवळ एका खुनाची नाही, तर ही गोष्ट आहे ‘सांस्कृतिक कला केंद्रांच्या’ पडद्याआड चालणाऱ्या अशा अंधाऱ्या जगाची, जिथे कला, पैसा आणि वासनेच्या खेळातून एका ३१ वर्षीय गर्भवती नर्तिकेचा निर्घृण बळी दिला जातो. या गुन्ह्याचे धागेदोरे जेव्हा पोलिसांच्या हाती लागले, तेव्हा जे सत्य समोर आलं, ते थरकाप उडवणारं होतं.
नमस्कार मित्रांनो, ‘क्राईम मिस्ट्री’ या भागात आज आपण उलगडणार आहोत— जामखेडच्या ‘सप्तसूर सांस्कृतिक कला केंद्रातील’ त्या रात्रीची खळबळजनक कहाणी!
सप्टेंबर २०२६ संपत आलाय. महिन्याच्या शेवटी धुळे पोलिसांना एक निनावी फोन येतो. धुळे-सोलापूर महामार्गावरील गरताड बारीजवळील एका डोंगरावर, नरव्हाळ शिवारातील मुरमाड टेकडीपाशी एका महिलेचा मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आढळल्याचे पोलिसांना सांगितले जाते. हा भाग वनक्षेत्र असल्याने निर्जन असतो. त्यामुळे घटना गंभीर होती. फोन आल्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचतात. तिथे केवळ राख आणि अर्धवट जळालेला देह असतो. जवळच पोलिसांना एक प्लास्टिकची बाटली सापडते, ज्यामध्ये पेट्रोल किंवा इतर कुठलातरी ज्वलनशील पदार्थ होता.
आता पोलिसांसमोर पहिलं आव्हान होतं— ती महिला कोण? मृतदेह इतका जळाला होता की ओळख पटवणं अशक्य होतं. पण जेव्हा शवविच्छेदन म्हणजेच पीएम रिपोर्ट येतो, तेव्हा पोलिसांच्या पायाखालची मातीच सरकते. रिपोर्टमध्ये समोर येतं की, मृत महिला ३१ वर्षांची असून ती तीन महिन्यांची गर्भवती होती. आणि सर्वात क्रूर गोष्ट म्हणजे, तिला मारून जाळलं नव्हतं, तर जिवंत असतानाच तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला संपवण्यात आलं होतं. आता मोहाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्यासमोर या अंधाऱ्या गुन्ह्याची उकल करण्याचं मोठं आव्हान होतं.
धुळे पोलिसांसमोर कोणताही प्रत्यक्षदर्शी नव्हता. कोणताही ठोस पुरावा नव्हता. पण धुळ्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे आणि मोहाडीच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी एक मास्टरप्लॅन आखला. त्यांनी धुळे-सोलापूर हायवेवरील तब्बल ११ तासांचे सीसीटीव्ही फुटेज सलगपणे तपासले. या तपासणीत त्यांना एका संशयास्पद पांढऱ्या रंगाच्या हुंडाई मोबिलो कारचा माग लागला. त्या कारचा नंबर होता MH 43 AR 4070. या कारचे तांत्रिक विश्लेषण केले असता, पोलिसांना समजले की ही कार थेट अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडमधून धुळ्याच्या दिशेने आली होती.
कारच्या मालकाचे नाव, गाव, पत्ता समजल्यावर पोलिसांचे एक विशेष पथक तातडीने जामखेडच्या ‘सप्तसूर कला केंद्रात’ रवाना झाले. त्यांनी संशयाच्या आधारे गाडीचा चालक सरफराज मोमीन याला ताब्यात घेतले. घटनेच्या वेळीही सरफराज हाच गाडी चालवत होता, हे समजल्यावर चाणाक्ष पोलिसांनी या घटनेची एक-एक कडी सोडवायला सुरुवात केली. त्यानंतर या कला केंद्राशी संबंधीत आरिफ शेख, स्वाती कुऱ्हाडे आणि लक्ष्मी पवार यांना ताब्यात घेतलं गेलं. जेव्हा पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने या सर्वांची चौकशी केली, तेव्हा त्यांनी जे कबूल केलं, ते ऐकून पोलिसांचेही डोके चक्रावले.
आरोपींनी पोलिसांना दिलेल्या कबुलीनुसार, मृत महिलेचे नाव पिंकी हमुमंत काटकर असल्याचे समजले. पिंकी ही ३१ वर्षांची असून ती रायगड जिल्ह्यातील रोहा येथील होती. परंतु ती गेल्या काही वर्षांपासून जामखेडच्या सप्तसूर कला केंद्रात काम करत होती. कला केंद्रात पिंकीचे काही जणांसोबत वाद झाले. या वादाचे पर्यावसान अपहरणात झाले. आता हा वाद पैशाचा, लावण्यांच्या बैठकीचा की आणखी कशाचा होता, हा शोध सुरु आहे. परंतु वादानंतर आरोपींनी पिंकीला गाडीत टाकले आणि आधी बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा चौफुली येथील एका बंद घरात नेले. तिथे या सर्वांनी मिळून त्या गरोदर महिलेला अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीत पिंकी बेशुद्ध पडली.
आरोपींना वाटले की पिंकी मरण पावली आहे. आता गुन्हा लपवण्यासाठी आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी एक भयानक कट रचला. त्यांनी पिंकीला त्याच हुंडाई मोबिलो कारमध्ये टाकले आणि ते हायवेने थेट राजस्थानच्या दिशेने निघाले. पण प्रवास करत असताना, धुळ्याजवळील गरताड बारी घाटातील निर्जन आणि डोंगराळ भाग पाहून त्यांनी गाडी थांबवली. पिंकीचा अर्धवट जीव असतानाच, त्यांनी तिला गाडीतून काढले, तिच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि आग लावून दिली! एका निष्पाप गर्भवती महिलेचा आणि तिच्या पोटातील बाळाचा तिथेच होरपळून अंत झाला आणि आरोपी मालेगाव-मनमाड मार्गे पुन्हा जामखेडला पसार झाले.
या गुन्ह्यातील मुख्य संशयीत-
सरफराज उर्फ शफीक अलीम मोमीन (रा. गांधीनगर, विलाल मशिदीजवळ, कळंब)
आरिफ उर्फ खुज्या आसिफ शेख (रा. इंदिरानगर, हावरगाव रोड, कळंब)
सप्तसूर कला केंद्राची कलाकार स्वाती उर्फ आरती गणेश कुऱ्हाडे (जामखेड)
लक्ष्मी बालाजी पवार (रा. बसस्टॅन्ड डेपोपाठीमागे, कळंब)
यांना ताब्यात घेतलंय. तर-
फारुख शेख (रा. कळंब)
आणि रोहिणी जाधव (रा. केंब्रीज काँलनी, जालना रोड, संभाजीनगर) हे दोघे फरार आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील ‘सांस्कृतिक कला केंद्रे’ नेमकी आहेत काय? इथे पारंपरिक लावणी, नृत्य आणि संगीताचे कार्यक्रम अधिकृतरीत्या चालवले जातात. अनेक गरिबीने होरपळलेल्या किंवा दुर्गम भागातील महिला इथे नृत्यांगना म्हणून येतात. या कला केंद्रात दिवसा शांतता असते, पण रात्र होताच घुंगरांचा आवाज घुमू लागतो. पण या कलेच्या पडद्याआड एक दुसरं जग चालतं. ज्याला स्थानिक भाषेत ‘बैठक व्यवस्था’ म्हणतात. इथे येणारे श्रीमंत ग्राहक, त्यांच्याकडून मिळणारी पैशांची ‘बिदागी’ म्हणजेच टिप, कला केंद्राचे मॅनेजर्स आणि तिथल्या नर्तिका यांच्यात पैशांचे व्यवहार चालतात.
सुरुवातीला सर्वकाही छान वाटतं, पण हळूहळू या ठिकाणी पैशांचा हव्यास, आर्थिक शोषण, अंतर्गत वर्चस्वाची लढाई आणि कलावंतांमधील हेवादावा सुरू होतो. मृत पिंकी हनुमंत काटकर ही देखील रायगड जिल्ह्यातील एका आदिवासी वाडीतून आपली उपजीविका भागवण्यासाठी याच ‘सप्तसूर सांस्कृतिक कला केंद्रात’ काम करत होती. पण तिला काय माहीत होतं की, ज्या घुंगरांच्या तालावर ती नाचतेय, तीच तिची मृत्यूची घंटा ठरणार आहे? या कला केंद्राच्या इतिहासावर आम्ही यापूर्वी एक व्हिडीओ केला आहे. जामखेडचा हा इतिहास तुम्ही नक्की पहा. या व्हिडीओची लिंक कमेंट बाँक्समध्ये दिली आहे.
मित्रांनो, पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या काही तासांत या गुन्ह्याचा छडा लावून मुख्य ४ आरोपींना बेड्या ठोकल्या. उर्वरित दोन फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. कला केंद्रातील पैशांचा माज, अंतर्गत हेवेदावे आणि क्रूर मानसिकतेमुळे आज एका महिलेला आणि तिच्या न जन्माला आलेल्या बाळाला जीव गमवावा लागला. या घटनेने हायवेवरील या कला केंद्रांच्या सुरक्षेचा आणि तिथल्या काळ्या धंद्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.





