
संपूर्ण राज्यात पावसाने ओढ दिली त्यामुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला असू शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे दुष्काळात होरपळत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा आमदार अमोल खताळ पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मांडल्या होत्या राज्य शासनाने राज्या तील२६५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले असून, त्यामध्ये संगमनेर तालुक्याचाही समावेश करण्यात आला आहे . त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना आता दुष्काळी सवलतींचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री आणि पालकमंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
शनिवारी दुपारी आमदार खताळ यांनी त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, चालू वर्षी संगमनेर तालुक्यात पावसात मोठा खंड पडल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. खरीप पिकांची परिस्थिती हाताबाहेर गेली असून, अनेक शेतकऱ्यांची पिके पावसाअभावी वाळून गेली आहेत. त्यामुळे तालुक्यातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन आपण मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडून तालुका लवकरात लवकर दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली होती.
दोन दिवसांपूर्वी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पिंपळे येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त सोयाबीन पिकांची पाहणी केली. त्यावेळी आपण त्यांच्यासमोर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य मांडून संगमनेर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी केली होती. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचीही भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री, पालकमंत्री तसेच महायुतीच्या विविध मंत्री आणि आमदारांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. या सर्व प्रयत्नांमुळे राज्यातील २६५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले असून, त्यात संगमनेर तालुक्याचाही समावेश झाला आहे. आता तालुक्यात दुष्काळाचे निकष लागू होणार असून, नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे केले जाणार आहेत. मात्र, शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी सरसकट पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे खताळ यांनी सांगितले. जलसंधारणाच्या कामांचे महत्त्व अधोरेखित करताना आमदार खताळ म्हणाले की, अतिवृष्टी असो किंवा दुष्काळ, जलसंधारणाची कामे केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. त्यामुळे दुष्काळ व्यवस्थापनाच्या कक्षेत तालुक्याचा समावेश झाल्याने शेतकऱ्यांना विविध सवलतींचा लाभ मिळणार आहे. आगामी काळातही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जे काही शक्य आहे, ते करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे.
मागील वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडले होते, तर यंदा पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवर पुन्हा संकट ओढवले आहे. निसर्गातील बदलांमुळे अशा परिस्थिती निर्माण होत आहेत. मात्र, महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याने त्यांनी चिंता करू नये, असे आवाहनही आमदार खताळ यांनी केले. दुष्काळग्रस्त भागांमध्ये मुलींच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झाल्यास शिवसेनेच्या वतीने त्यांच्या लग्नाची जबाबदारी घेतली जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले असल्याची माहितीही आमदार खताळ यांनी यावेळी दिली.
दुष्काळग्रस्त तालुका जाहीर; शेतकऱ्यांना दिलासा
राज्यातील महायुती सरकारने २६५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले असून, त्यामध्ये संगमनेर तालुक्याचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध दुष्काळी सवलतींचा लाभ मिळणार आहे. जमीन महसुलात सूट, शेती कर्जाच्या वसुलीला स्थगिती किंवा कर्जाची पुनर्रचना, वीज बिलात सवलत, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सवलत, रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये सवलत, टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि पशुधनासाठी चाऱ्याची व्यवस्था अशा उपाययोजना करण्यात येणार आहेत. सरकारने साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांचे वीज बिल यापूर्वीच माफ केले आहे. त्यापुढील वीज वापरासाठीही सवलत दिली जाणार आहे. शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित न करण्याबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. दुष्काळाच्या या संकटात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे — अमोल खताळ, आमदार





