
भिंगारमधील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या लाठीचार्जनंतर वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणाची चौकशी आता श्रीरामपूरचे अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे करणार आहेत. तर दिपक वाघस्कर यांच्या दुर्दैवी मृत्यूचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.
चौकशी पूर्ण होईपर्यंत भिंगार कॅम्पच्या प्रभारी अधिकारी API तेजश्री थोरात यांच्यासह काही कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येणार असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी दिली.
वाघस्कर यांच्या मृत्यूनंतर भिंगारमध्ये तणाव निर्माण झाला असून, गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणूक थांबवली होती. शहरात बंदही पाळण्यात आला.
आमदार संग्राम जगताप यांनी या प्रकरणात एसआयटी चौकशीची मागणी करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांच्या नियोजनावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, नातेवाईक, लोकप्रतिनिधी आणि विविध संघटनांच्या आक्षेपांचा अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे.





