
पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री प्रकरणाच्या तपासाला पुन्हा वेग आला आहे. या प्रकरणातील नऊ आरोपींच्या बँक खात्यांमध्ये सुमारे २३ कोटी रुपये पाठवल्याच्या व्यवहारासंदर्भात पुण्यातील उद्योजक अतुल चोरडिया आणि अशोक चोरडिया यांना पारनेर पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस बजावली आहे.
पोलिस निरीक्षक तथा तपासी अधिकारी सोमनाथ दिवटे यांनी ही नोटीस दिली. संबंधित आर्थिक व्यवहार नेमका कशासाठी झाला, त्याचा कारखाना खरेदीशी काय संबंध आहे आणि निधीचा वापर कसा करण्यात आला, याबाबत पोलिसांकडून माहिती घेतली जाणार आहे.
कारखाना बचाव समितीने या व्यवहारावर गंभीर प्रश्न उपस्थित करत चोरडिया बंधूंच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. मात्र, समितीने केलेले काळा पैसा आणि करचुकवेगिरीचे आरोप हे आरोपच असून, त्यांची सत्यता तपासातून स्पष्ट होणे बाकी आहे.
दरम्यान, चोरडिया बंधूंनी आजारी असल्याचे कारण दिल्याचे पोलिसांनी सांगितले असून, पुढील आठवड्यात त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.





