
नगरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे आणि बीडला जोडणारी बहुप्रतीक्षित थेट रेल्वेसेवा अखेर सुरू होण्याच्या मार्गावर आहे. ही गाडी अहिल्यानगर स्थानकावरून धावेल. मंडळी, गुरुवारी, १७ सप्टेंबर रोजी बीड रेल्वे स्थानकावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन होणार आहे.
रेल्वे बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, पुण्याहून गाडी रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी सुटेल आणि सकाळी ६ वाजता बीडला पोहोचेल. तर बीडहून रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी सुटणारी गाडी पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी पुण्यात पोहोचणार आहे.
या रेल्वेला तब्बल १६ डबे असून, एकावेळी सुमारे २ हजार प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. उरुळी, दौंड कॉर्ड लाइन, श्रीगोंदा रोड, अहिल्यानगर, नारायणडोहो, नवीन आष्टी आणि अमळनेर या स्थानकांवर रेल्वेला थांबे असतील.
नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी आणि मराठवाड्यात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. नियमित सेवा नेमकी कधीपासून सुरू होईल, याची तारीख मात्र अद्याप जाहीर झालेली नाही.





